मुंबई मध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये केले.
‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ च्या निमित्ताने आज जगभरातील सागरी तज्ज्ञ, उद्योगपती आणि प्रतिनिधी भारतात एकत्र आले असल्याचे सांगून, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले की, ‘गेटवे ऑफ इंडिया’ आता ‘गेटवे ऑफ द वर्ल्ड’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताचा ११ हजार किलोमीटरचा किनारा आता जागतिक विकास केंद्र होत आहे. सागरी क्षेत्र देशाच्या ‘जीडीपी’त ६० टक्क्यांहून अधिक योगदान देते. पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारत सागरी व्यापारात अग्रस्थानी होता. आज इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत पुन्हा आपली सागरी ताकद सिद्ध करत आहे. सागर, सागरमाला, गतिशक्ती आणि समुद्रयान यासारख्या प्रकल्पांमुळे सागरी पायाभूत सुविधांना नवे बळ मिळाले आहे. भारत जहाजबांधणीत जगात पाचव्या क्रमांकावर असून नवीन बंदरांचीही उभारणी वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले.
देशातील ९० टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. २०४७ पर्यंत भारत जागतिक सागरी नेतृत्व प्राप्त करण्याचे ध्येय आहे. वाढवण बंदर लवकरच जगातील टॉप १० बंदरांमध्ये गणले जाणार आहे. ग्रेटनिकोबार व कोचिन बंदरात नव्या गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेसाठीही सरकारने ठोस उपाययोजना केल्या आहेत. जागतिक गुंतवणूकदारांनी भारताच्या सागरी क्षेत्रात सहभागी होऊन आपल्या आणि भारताच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहनही केंद्रीय गृह मंत्री शाह यांनी यावेळी केले.
















