
नागपूर-पुणे ‘वंदे भारत एक्सप्रेस’ गाडी देशातील सर्व वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये सर्वाधिक अंतर पार करणारी गाडी आहे. सध्या नगर-दौंड मार्गे पुणे येथे जाणाऱ्या गाडीला शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा फेरा पडतो. त्यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाला असे सुचवण्यात आले आहे की, नगर ते पुणे असा थेट मार्ग तयार करण्यात आला तर प्रवासाचे अंतर कमी होईल व वेळही वाचेल. पुढील काळात याबाबत नियोजन करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर व पुणे हा औद्योगिक पट्टा असून येथील विकास साधायचा तर रेल्वेचे नवीन मार्ग निर्माण करणे गरजेचे आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन एक्सप्रेस वे निर्माण करण्यात येणार असून त्याच्या ‘राईट ऑफ वे’मध्ये या रेल्वे मार्गाचा विचार केल्यास प्रवासाचे अंतर अधिक कमी करता येणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागपूर(अजनी)-पुणे ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर जवळपास बारा तासात कापणे शक्य होणार असून यामुळे यापूर्वी लागणारा प्रवासाचा अधिकचा वेळ वाचणार आहे. अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड येथील स्थानकावर थांबून दौंड कॉर्डलाइन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे.