Home नंदुरबार राष्ट्रीय पातळीवर नंदुरबार जिल्ह्याची गौरवास्पद कामगिरी!

राष्ट्रीय पातळीवर नंदुरबार जिल्ह्याची गौरवास्पद कामगिरी!

0
Nandurbar district's proud achievement at the national level!

(नंदुरबार) जिल्ह्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी छाप उमटवली आहे. नीती आयोगाच्या ‘NITI for States – Use Case Challenge’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याच्या अभिनव आणि डेटा-आधारित उपक्रमांना उच्च दर्जाची मान्यता प्राप्त झाली आहे.

या स्पर्धेचा उद्देश देशभरातील जिल्ह्यांनी स्थानिक समस्यांसाठी तयार केलेल्या डेटावर आधारित उपाययोजनांचे मूल्यमापन करणे हा होता. एकूण २५० जिल्ह्यांनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमात नंदुरबार जिल्ह्याने पाच अभिनव उपक्रम सादर केले होते:

1️⃣ शिक्षण: मुलींसाठी शौचालय सुविधा

2️⃣ शिक्षण: ग्रामीण वाचनालय उपक्रम

3️⃣ कृषी: मिलेट प्रोसेसिंग क्लस्टर विकास

4️⃣ आरोग्य: उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांना NQAS प्रमाणपत्र मिळविण्याचा उपक्रम

5️⃣ आरोग्य: सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम

या सर्व उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर अंतिम फेरीसाठी निवड मिळाली, तर ‘सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम’ या आरोग्य विभागातील उपक्रमाने द्वितीय क्रमांक मिळवत जिल्ह्याचा मान वाढविला आहे.

सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम — आरोग्यदायी नंदुरबारकडे वाटचाल:

सदर मोहिमेचा शुभारंभ मा. पालकमंत्री यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आला होता. या मोहिमेअंतर्गत सिकल सेल आजाराच्या प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती, समुदायस्तरावर तपासणी,निदान आणि उपचार सेवा यासाठी अत्याधुनिक डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली वापरण्यात आली. ही मोहीम डेटा-आधारित प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून राष्ट्रीय स्तरावर गौरवली गेली आहे.

नंदुरबार जिल्ह्याने पुढील दोन वर्षांत संपूर्ण जिल्ह्याच्या लोकसंख्येचे सिकल सेल स्क्रिनिंग पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी ग्रामस्तरावर आरोग्य कर्मचारी आणि मोबाईल हेल्थ टीम्सकडून नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर मोहिमेची एक मोठी उपलब्धी म्हणजे — हायड्रॉक्सीयुरिया (Hydroxyurea) ही औषध आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (PHC) मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही औषध सिकल सेल अॅनिमिया रुग्णांसाठी ‘प्रोफायलेक्सिस ड्रग’ म्हणून कार्य करते — म्हणजेच, ती आजाराच्या तीव्र झटक्यांपासून बचाव करते आणि रक्तपेशींचे नुकसान कमी करते.

जर कोणत्याही रुग्णाला ही औषध मिळाली नाही, किंवा उपचारात अडचण येत असेल, तर खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

📞 जिल्हा सिकल सेल आजार नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक:

02564-299274 / 02564-299291

या यशस्वी उपक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर २०२५ रोजी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (Lal Bahadur Shastri National Academy of Administration – LBSNAA), मसूरी येथे सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान ‘Viksit Bharat Strategy Room (VBSR)’ चे उद्घाटन आणि ‘NITI for States’ च्या पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपले यशस्वी उपक्रम सादर केले, ज्यातून स्थानिक स्तरावरील नवोन्मेष कसा राष्ट्रीय स्तरावर परिवर्तन घडवू शकतो, हे स्पष्ट झाले.

ही कामगिरी केवळ नंदुरबार जिल्ह्याची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याची अभिमानाची गोष्ट आहे.

Maha Arogya IEC Bureau

#Nandurbar#NITIforStates#UseCaseChallenge#LBSNAA#SickleCellFreeIndia#SickleCellElimination#DataDrivenGovernance#DrMittaliSethi#NITIAYOG#ViksitBharat#AspirationalDistricts