नंदुरबार तालुका कृषि अधिकारी कार्यालय आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आत्मा कार्यालय सभागृह, नंदुरबार येथे अधिकारी, कर्मचारी तसेच माविम प्रतिनिधींसाठी ‘फार्मर्स कप (गट शेती)’ संदर्भातील तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचा उद्देश शेतकऱ्यांना गटशेतीतून एकत्रितपणे जलसंधारण, मृदसंवर्धन आणि शाश्वत शेती पद्धती विकसित करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे हा होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. टी. व्ही. खर्डे, कृषि उपसंचालक, नंदुरबार हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की – ‘पाणी फाऊंडेशनचा फार्मर्स कप हा केवळ स्पर्धा नसून ग्रामीण भागात शाश्वत विकासाची चळवळ आहे. शेतकऱ्यांनी गटशेती, जलसंधारण आणि सामूहिक नियोजनावर भर दिल्यास शेती उत्पादनात व उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते.’
या प्रसंगी श्री. एस. एस. राजपूत, तालुका कृषि अधिकारी, नंदुरबार यांनी गटशेतीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी आणि कृषी विभागाच्या उपलब्ध योजनांची माहिती दिली. श्री. एम. पी. पवार, तंत्र अधिकारी, नंदुरबार यांनी आधुनिक शेतीतील नवकल्पना आणि शेतकऱ्यांच्या सहभागाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पाणी फाऊंडेशन चे तालुका प्रमुख श्री. योगीराज हाके, तसेच सीमा पाडवी, स्वप्नील गोसावी आणि गोपाल पाडवी यांनी फार्मर्स कपच्या नियमावली, गट नोंदणी प्रक्रिया, गुणांकन पद्धती आणि स्पर्धेतील नवकल्पनांबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेत अधिकारी, कृषि सहाय्यक, माविम प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागींस शाश्वत शेती, पाणलोट व्यवस्थापन आणि सामूहिक जबाबदारी या संकल्पनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
#Nandurbar#FarmersCup#PaaniFoundation#SustainableFarming#GroupFarming#जलसंधारण#शाश्वतशेती#नंदुरबारजिल्हा#AtmaNandurbar#AgricultureDevelopment
















