नंदुरबार जिल्ह्याने संपूर्ण देशातील निवडक जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य आणि पोषण या विषयावर केंद्रित अभिनव ‘आरोग्य धमनी’ हे एकात्मिक आदिवासी आरोग्य मॉडेलचे नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये सादर करण्याचा मान मिळाला
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आरोग्य आणि पोषण या विषयावर केंद्रित विशेष बैठकीत ‘आरोग्य धमनी’ हे मॉडेल सादर केले. हे मॉडेल आदिवासी भागांमध्ये आरोग्य सुविधा पोहोचविणे, कुपोषण कमी करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे सादरीकरण नीती आयोगाच्या वतीने आयोजित “आकांक्षित जिल्हे व तालुके कार्यक्रम” अंतर्गत ‘राष्ट्रीय आदर्श प्रथा परिसंवाद’ या उपक्रमाचा एक भाग होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम, व्यवस्थापकीय संचालक रोहित कुमार, माजी केंद्रीय कॅबिनेट सचिव व नीती आयोग सदस्य राजीव गौबा आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे सचिव अशोक मीणा यांच्या उपस्थितीत झाले.
या परिसंवादात देशभरातील 20 जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या जिल्ह्यातील यशस्वी उपक्रम, काम करण्यातील अनुभव आणि इतरत्रही राबविता येतील अशा योजनांची माहिती दिली. त्यामुळे जिल्हा व तालुका स्तरावर नवीन कल्पना राबविण्यास व त्यांचे आदानप्रदान करण्यास मदत होणार आहे.
या सादरीकरणाप्रसंगी सहमंडळ सदस्य म्हणून डॉ. विनोद कुमार पॉल, महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक, राजस्थानमधील बारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहिताश्व सिंह तोमर आणि मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्याच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी विनिता कंसवा यांनी सहभाग घेतला. संपूर्ण परिसंवादात मोठ्या प्रमाणावर उपस्थितांनी भाग घेतला आणि शेवटी सेवा कशी चांगली देता येईल आणि प्रशासन कसे अधिक चांगले चालवता येईल याबाबत सूचना देऊन परिसंवादाचा समारोप झाला
इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरेल-डॉ. मित्ताली सेठी
या सादरीकरणातून ‘आरोग्य धमनी’ उपक्रमातील नवकल्पना, विभागांतील समन्वय आणि आदिवासी आरोग्य क्षेत्रातील शिफारशींची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून, आरोग्य आणि पोषण क्षेत्रातील जिल्ह्याची कामगिरी इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी याबद्दल बोलताना सांगितले.
0000000000