नाशिक : नाशिक जिल्ह्यात आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी आणि ग्रामीण ते शहरी भागांपर्यंत बँकिंग सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘नाशिक जिल्हा बँकिंग रोडमॅप’ अंतर्गत १० महत्त्वपूर्ण विकास स्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. या रोडमॅपमुळे कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
या रोडमॅपमध्ये कृषी व ग्रामीण आर्थिक विकासाबरोबरच शहरी पायाभूत सुविधा, उद्योजकता आणि हरित ऊर्जेवर विशेष भर देण्यात आला आहे.
कृषी व ग्रामीण आर्थिक विकासाला चालना
ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी ‘रूरल अॅक्सेस’ अंतर्गत अद्याप बँकविरहित गावांमध्ये नवीन शाखा उभारण्याचा मानस आहे. तसेच ‘अॅग्रीकल्चर अँड केसीसी सॅच्युरेशन’ अंतर्गत किसान क्रेडिट कार्डचे (KCC) प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, सिबिलसंबंधित अडचणी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
दुग्ध, कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसाय यांसारख्या ‘ब्लू-व्हाइट रिव्होल्यूशन’ क्षेत्रांना कर्जपुरवठा वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे.
स्वयं-साहाय्य गट व अन्न प्रक्रिया उद्योगांना बळ
‘सोशल ग्रुप्स’ अंतर्गत स्वयं-साहाय्य गटांना (SHG) दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यातील कर्ज वितरण करून उपजीविका वाढवण्यावर भर दिला जाईल.
तसेच ‘फूड इंडस्ट्री’मध्ये पीएमएफएमई (PMFME) योजनेअंतर्गत दुग्ध, वाईन आणि मिलिंग उद्योगांना मोठ्या कर्जाच्या माध्यमातून चालना दिली जाणार आहे.
शहरी विकास व रोजगारनिर्मिती
शहरी भागात ‘अर्बन क्रेडिट’ अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचे वितरण वेगाने करण्याचे नियोजन आहे.
‘एम्प्लॉयमेंट’ अंतर्गत पीएमजीएसपी व सीएमईजीपी योजनांद्वारे ३२ वर्षांखालील युवकांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
शाश्वत विकासावर भर
‘सस्टेनेबिलिटी’ या स्तंभांतर्गत पीएम सूर्यघर योजनेद्वारे घराघरांत सौरऊर्जा प्रकल्प उभारून १०० टक्के सॅच्युरेशन साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
गृहनिर्माण व पायाभूत सुविधा
‘रिअल इस्टेट’ अंतर्गत गृहनिर्माण कर्ज व अपूर्ण प्रकल्पांना वित्तपुरवठा करून स्थावर मालमत्ता क्षेत्राला चालना दिली जाईल.
तर ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ विभागात सुमारे १४,००० कोटी रुपयांच्या संभाव्य गुंतवणुकीसह रिंग रोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ठेवी संकलन आणि विकासाला प्राधान्य दिले जाईल. यामध्ये २५ विकसित होणाऱ्या गावांचा लाभ होणार आहे.
सर्वसमावेशक विकासाचा मार्ग
हा रोडमॅप जिल्ह्यातील आर्थिक समावेशन, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असून, बँकिंग क्षेत्राच्या सक्रिय सहभागातून ‘समृद्ध नाशिक’ घडवण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
















