Home टेक न्युज ‘अमृत-सक्षम’ उपक्रमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेची नवी संधी

‘अमृत-सक्षम’ उपक्रमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेची नवी संधी

1
New entrepreneurship opportunity in the waste management sector through the ‘Amrut-Saksham’ initiative.

मुंबई : महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन क्षेत्र वेगाने विकसित होत असून ते केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता हरित उद्योग (ग्रीन बिझनेस) म्हणून उदयास येत आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरण संरक्षणाबाबतची वाढती जागरूकता आणि पुनर्वापराला मिळणारे प्रोत्साहन यामुळे या क्षेत्रात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर ‘अमृत-सक्षम’ हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान उद्योजक, निवृत्त अधिकारी-कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांना कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि व्यवसाय विकासाचे सर्वंकष सहाय्य दिले जाणार आहे. कचरा ही समस्या नसून उत्पन्नाचा शाश्वत स्रोत ठरू शकतो, यावर या उपक्रमाचा भर आहे. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूपनिर्मिती, प्लास्टिक, कागद आणि काचेचे पुनर्वापर (रिसायकलिंग), तसेच ‘रिसोर्स रिकव्हरी सेंटर’ उभारणी यांसारख्या व्यवसायांच्या संधींबाबत इच्छुकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

‘अमृत-सक्षम’ हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून व्यवसायाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंतचा सर्वसमावेशक उपक्रम आहे. यामध्ये व्यवसायाची निवड, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना व अनुदानांचा लाभ, तसेच उत्पादनाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन केले जाणार आहे. या क्षेत्रातील कोणताही पूर्वानुभव आवश्यक नसून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान व्यावसायिक, निवृत्त अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना संस्थेच्या विविध योजनांचा लाभही उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी उमेदवारांना क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बाजारपेठेतील मोठ्या खरेदीदारांशी नेटवर्किंगची संधी तसेच अमृतच्या विविध योजनांतर्गत उद्योग उभारणीसाठी सहाय्य मिळणार आहे. यामध्ये वैयक्तिक व्याज परतावा योजनेचाही समावेश आहे.

इच्छुकांनी ‘अमृत-सक्षम’च्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ‘अमृत’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. https://amrut-saksham.mahaamrut.org.in/ किंवा अमृत च्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘अमृत-सक्षम’ची टीम पात्र उमेदवारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्या जिल्ह्यातील कार्यशाळेची तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची माहिती देणार आहे. या व्यवसायाविषयी प्राथमिक माहिती देण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता AMRUT च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट (लाईव्ह) (https://youtube.com/@mahaamrutpune?si=JZPTLSS ) मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

उपक्रमासंदर्भातील अधिक माहितीसाठी ७७५७०९१८५९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच जिल्हानिहाय संपर्क तपशील आणि अन्य माहिती अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.