Home आरोग्य लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापरासंबंधी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्र सरकारचे...

लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापरासंबंधी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्र सरकारचे नवे मार्गदर्शक तत्त्वे जारी.

1
New guidelines issued by the Central Government for all states and Union Territories regarding the use of cough syrups for children.

नवी दिल्ली : लहान मुलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या सूचनांनुसार, बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.

कफ आणि सर्दीवर प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि आधार देणारे उपाय यांचा समावेश आहे. औषधोपचार आवश्यक असल्यास, डॉक्टरांनी रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करून आणि जवळच्या देखरेखीखाली औषधे द्यावीत. डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस आणि उपचाराच्या कालावधीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. एकाच वेळी अनेक औषधे मिसळून देणे टाळावे, असेही निर्देश आहेत.

सर्व आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार (GMP) तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची कफ सिरप्स खरेदी करावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे. यामुळे औषधांची सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित होईल.

या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने, जिल्हा आरोग्य विभाग, औषध वितरण केंद्रे, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीने करावी, असे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

000000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष -223

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi / https://x.com/MahaMicHindi