नवी दिल्ली : दिल्लीस्थित मराठी अधिकाऱ्यांच्या ‘पुढचे पाऊल’ या उपक्रमामार्फत यंदाही संघ लोकसेवा आयोगच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या मराठी उमेदवारांचा सत्कार 20 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. सलग सातव्या वर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाची घोषणा ‘पुढचे पाऊल’ संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय विदेश सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषदेत केली.
दिल्लीतील मराठी अधिकाऱ्यांच्या ‘पुढचे पाऊल’ या संस्थेमार्फत २०१८ पासून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संघ लोकसेवा आयोगच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठी उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम मराठी तरुणांना भारतीय प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारा ठरत असून, महाराष्ट्रातील तसेच बृहन्महाराष्ट्रातील उमेदवारांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.
यंदा महाराष्ट्रातील तब्बल 90 उमेदवार संघ लोकसेवा आयोगच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. त्यांचा सत्कार 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता, एन.डी.एम.सी. कन्व्हेन्शन हॉल, दिल्ली येथे होणार आहे. कार्यक्रमाचे तीन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले असून, प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांसाठी प्रश्नोत्तर आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातील. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता मुख्य सत्कार समारंभ पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण खात्याचे सचिव संजय कुमार, ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे विवेक कुलकर्णी आणि सविता ताई कुलकर्णी, तसेच एस.एस.बी. चे अतिरिक्त महासंचालक अनुपमा चंद्रा व सी.आय.एस.एफ. चे अतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी दिल्लीतील अनेक वरिष्ठ मराठी अधिकारीही मार्गदर्शन करणार आहेत.
‘पुढचे पाऊल’ या संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सल्लागार माजी केंद्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या संदर्भात महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, लँड पोर्ट प्राधिकरणाच्या वित्त सदस्य रेखा रायकर ही उपस्थित होते.
कार्यक्रमाला सर्वांनी उत्साहाने उपस्थित राहावे आणि व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, हा कार्यक्रम ‘पुढचे पाऊल’ पोर्टलवर थेट प्रक्षेपित केला जाणार असून, जे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांनाही ऑनलाईन या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
0000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष -179
एक्स वर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi
















