
कांद्यावर प्रक्रिया उद्योगास चालना देण्यावर भर देण्यास शासन कटिबद्ध आहे, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. येथे एस-फोर-एस टेक्नॉलॉजीजच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत मंत्री रावल यांनी कांदा प्रक्रिया व साठवणुकीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली.
महाराष्ट्र देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. देशातील सुमारे ७० टक्के कांदा देशांतर्गत वापरला जातो, तर उर्वरित ३० टक्के अतिरिक्त उत्पादनावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे अत्यावश्यक आहे. कांद्यावरील प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजेत. तयार पदार्थांची विक्री टप्प्याटप्प्याने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात करता येईल. तसेच या प्रक्रियेत महिला बचतगटांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात यावा. शासनासाठी शेतकरीहित सर्वतोपरी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांचे हित तर जपलेच जाईल, शिवाय स्थानिक रोजगारनिर्मिती होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालनाही मिळेल – मंत्री रावल
या बैठकीस महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक तथा महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.अमोल यादव, मे. एस-४-एस टेक्नॉलॉजीजचे प्रतिनिधी अश्विन पावडे, मॅग्नेटचे प्रकल्प उपसंचालक संजय पिंगट आदी उपस्थित होते.















