Home आरोग्य गरीब व गरजू रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपणाचा खर्च कॉर्पस फंडातून देणार – आरोग्यमंत्री...

गरीब व गरजू रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपणाचा खर्च कॉर्पस फंडातून देणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0
Organ transplant costs for poor and needy patients to be covered by the corpus fund – Health Minister Prakash Abitkar

गरीब व गरजू रुग्णांच्या अवयवप्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा. त्याद्वारे राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भातील बैठकीत दिले.

सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयातील समिती कक्षात नुकतीच आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

पश्चिम महाराष्ट्रासह सीमावर्ती गोवा व कर्नाटक भागातील आणि ग्रामीण रुग्णांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे. या केंद्रात सीटी स्कॅन, एक्स-रे, ईसीजी, टू-डी इको आणि यूएसजीसारख्या निदान सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना तपासण्यांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जाण्याची गरज कमी होणार आहे.

कर्करोगावरील प्रोटॉन थेरपीची सुविधा सध्या महाराष्ट्रात केवळ मुंबईत उपलब्ध असल्याने अनेक रुग्ण या उपचारांपासून वंचित राहतात. त्यामुळे रुबी हॉल क्लिनिक आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या समन्वयातून पुण्यात कमी खर्चात प्रोटॉन थेरपीची अत्याधुनिक सुविधा सुरू करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.