
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गोविंद अंहकारी, रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापक शिल्पा छेडा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या काळात ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ऑनलाईन आर्थिक व्यवहारांतील अपप्रकाराच्या, फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. अशा प्रकारचे आर्थिक नुकसानीचे गैरप्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहारात खबरदारी घेत सर्तकतेने सुरक्षित व्यवहार करणे गरजेचे असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव यांनी सांगितले.
खबरदारी घेतल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करता येऊ शकतात. यादृष्टीने ग्राहकांनी कायम आपले ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा सीव्हीव्ही क्रमांक दुसऱ्या कोणालाही सांगू नयेत. तसेच बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था फोन, मेसेज किंवा ई-मेलद्वारे अशी माहिती कधीही मागत नाही. अशा प्रकारचा फोन किंवा दूरध्वनी आल्यास तो फसवणुकीचा असण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन माहिती देऊ नये. बँकिंग, यूपीआय, वॉलेट, ऑनलाईन खरेदी अशा व्यवहारांमध्ये थोडासा निष्काळजीपणा ग्राहकांना मोठ्या आर्थिक नुकसानीकडे नेऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही श्री. बच्छाव यांनी सांगितले.
व्यवस्थापक शिल्पा छेडा म्हणाल्या की, भारतीय रिझर्व्ह बॅंकेमार्फत ग्राहकांच्या सेवेकरिता तक्रार निवारण सुविधा उपलब्ध आहे. जर तुमची बँक ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याशी संबंधित तक्रारींबाबत समाधानकारक उपाय देत नसेल किंवा तक्रारींच्या अनुषंगाने तत्परतेने ठोस कारवाई करत नसेल, तर अशा प्रकरणात संबंधित ग्राहक रिझर्व्ह बँकेकडे आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्राहक आपली तक्रार ईमेल किंवा पत्राद्वारे दाखल करु शकतात.















