(शहादा)
सन २०२५-२६ अंतर्गत फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन योजना (हॉर्टसॅप) या योजनेअंतर्गत शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्यातील निश्चित प्लॉटधारक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम के. व्ही. पटेल कृषि महाविद्यालय, शहादा येथे पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. एल. पटेल यांनी केले. प्रारंभी उपविभागीय कृषि अधिकारी श्री. के. एस. वसावे यांनी प्रास्ताविक करून योजनेबद्दल माहिती दिली. तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय नंदुरबारचे तंत्र अधिकारी श्री. यु. बी. भदाणे यांनी योजनेचा उद्देश व कार्यपद्धती स्पष्ट केली.
हॉर्टसॅप योजनेचा मुख्य हेतू म्हणजे आकस्मिकरित्या उद्भवणाऱ्या किडरोगांचा प्रादुर्भाव वेळेत समजून घेणे, त्यांचे शेतकऱ्यांवरील आर्थिक नुकसान टाळणे आणि योग्य व्यवस्थापन सल्ला देणे हा आहे. यासाठी प्रत्येक सहाय्यक कृषि अधिकारी दोन निश्चित प्लॉट निवडतात आणि आठवड्यातील ठराविक दिवशी शेतात निरीक्षण करून माहिती ॲपवर नोंदवतात. या माहितीच्या आधारे किडीची तीव्रता व आर्थिक नुकसान पातळीचा अंदाज घेऊन त्वरित उपाययोजना सुचवता येते.

या प्रशिक्षणात श्री. कुणाल पाटील (सहायक प्राध्यापक, कृषि कीटकशास्त्र) यांनी केळी पिकांवरील किडींची ओळख, लक्षणे व व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. तर श्री. सपकाळे (सहायक प्राध्यापक, कृषि रोगशास्त्र) यांनी केळी पिकांवरील रोगांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन प्रा. श्री. भरत चौधरी यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन श्री. गणेश सदगीर, तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, शहादा यांनी केले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी आधुनिक शास्त्राधारित पद्धतींबाबत ज्ञान मिळाले असून उत्पादनात घट होण्यापासून बचाव होण्यास मदत होणार आहे.#HortSAP#कृषीविभाग#Nandurbar#Shahada#FarmerTraining#किडरोगव्यवस्थापन#BananaCrop#AgricultureAwareness#CollectorOfficeNandurbar#कृषीजनजागृती