अमरावती : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येणार आहे. पाच टप्प्यात प्रत्येक महसूल मंडळात एक कार्यक्रम याप्रमाणे 95 कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
महाराजस्व अभियान मार्च ते मे या कालावधीत महसूल मंडळ आणि नगर परिषद, नगर पंचायत स्तरावर राबविले जाणार आहे. या अभियानात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच दिवसात सेवा देण्यात येणार आहे. यात प्रलंबित आणि विवादग्रस्त फेरफार प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे, सातबारामधील चुका दुरुस्त करणे आणि डिजिटल सातबारा व आठ अ उतारे उपलब्ध करून देणे, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमीलेअर यांसारखी महत्त्वाची प्रमाणपत्रे वितरीत करणे, अकृषिक परवानगीबाबत नवीन सुलभ तरतुदी, सनद प्रणाली रद्द झाल्याचे फायदे आणि सुधारीत तुकडेबंदी कायद्याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.
अभियानाची सुरवात 7 मार्च रोजी होणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वलगाव येथे या अभियानाची सुरवात होणार आहे. 7 मार्च रोजी 18, 14 मार्च रोजी 17, 10 एप्रिल रोजी 18, 17 एप्रिल रोजी 14, 8 मे रोजी 17 आणि 15 मे रोजी 14 मंडळात समाधान शिबीर घेण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्याशी निगडीत जिवंत सातबारा, सामाजिक अर्थ सहायाच्या योजना, तुकडेबंदी, फेरफार, घरपोच सातबारा, सातबारावरील दुरूस्ती, पट्टेवाटप आदी सुविधांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. समाधान शिबिरात येणााऱ्या कोणत्याही नागरिकाला या प्रक्रियेत त्रास होणार नाही आणि सर्व सेवा पारदर्शकपणे पुरविल्या जातील याची दक्षता घेण्यात येणार आहे. शिबीराच्या ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव उपस्थित होते.
















