रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रस्ता उड्डाण पुलासह राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या एकूण ९ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड [महारेल] यांनी विकसित केलेल्या या प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून, त्यापैकी १० हजारपेक्षा जास्त दळणवळण असलेल्या १२१ फाटकांसोबतच इतरही १४५ रेल्वेवरील पुलांच्या बांधकामांना मान्यता दिली असून, हे संपूर्ण काम येत्या तीन वर्षांत महारेलतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्पासंदर्भातील बांधकामासाठी महारेलची स्थापना केल्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उड्डाण पुलासोबतच येथील व्यावसायिकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसेच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार असल्याचे अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले
















