Home नंदुरबार जिल्हा वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

22
Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit
Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit

विविध उपक्रमातून २५ वर्षांच्या उपलब्धी आणि भविष्याचा वेध घेणार

(नंदुरबार) २०२३-२४ हे वर्ष जिल्ह्याचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून निरनिराळ्या उपक्रमातून जिल्ह्यातील गेल्या २५ वर्षातील उपलब्धी व भविष्याचा वेध घेतला जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल (नंदुरबार), मंदार पत्की (तळोदा), उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, वरिविक्षाधिन सनदी अधिकारी अंजली शर्मा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया व जिल्हा प्रशासनातील विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती गठीत करण्यात येत असून जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीचे उपाध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव तर सर्व यंत्रणांचे प्रमुख हे सदस्य असतील. प्रत्येक शासकीय यंत्रणेने आपल्या विभागात गेल्या पंचवीस वर्षातील २५ उपलब्धींचे संकलन करावे. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील सद्यस्थिती व भविष्यातील शक्यता याबाबत एक टिपणी करून समितीस उपलब्ध करून द्यावी. त्यानुसार प्रत्येक विभागाच्या कामाच्या प्रगतीवर व भविष्यावर आधारित चर्चासत्रांचे दर पंधरा दिवसांनी आयोजन करण्यात यावे. तसेच चित्रकला, वक्तृत्व, निबंध यासारख्या स्पर्धांचे शालेय स्तरावर आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरतील अशा उपक्रमांची रौप्यमहोत्सवी वर्षात आखणी करण्यात यावी. जिल्ह्याच्या २५ वर्षांच्या वाटचालीवर आधारित कॉफी टेबल बुक, माहितीपट, इन्फोग्राफ्स संदेश यांच्या प्रसिद्धीचे नियोजन करण्यात यावे.

नंदुरबार जिल्ह्याला स्वतंत्र असा सांस्कृतिक वारसा लाभला असून आदिवासी संस्कृतीची रूपेरी किनार या वारसाला लाभली आहे. या जिल्ह्यात अमर्याद अशा प्रयटनाच्या संधी आहेत. स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असून बहसांस्कृतिक जिल्हा म्हणूनही नंदूरबारची ओळख असून येथील पारंपरिक उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक, पर्यटन व साहित्यिक उत्सवांचेही आयोजन करण्यात यावे. राज्याच्या दार्शनिका विभागामार्फत जिल्ह्याच्या गॅझेटियरची निर्मिती सुरू असून त्या कामाचा आढावा घेवून या रौप्य महोत्सवी वर्षात त्याचे प्रकाशन करण्याचाही मानस असल्याचे मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

विविध उपक्रमातून साजरा होणार जिल्ह्याचा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस :मनीषा खत्री

१ जुलै २०२३ रोजी रौप्य महोत्सवी स्थापना दिवस जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून साजरा केला जाणार असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय इमारतींवर रोशनाई करण्यात यावी. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वन विभागाच्या सहकार्याने सर्व शासकीय विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी तथा रौप्य महोत्सव समन्वय समितीच्या अध्यक्ष मनीषा खत्री यांनी यावेळी दिली.