Home महाराष्ट्र मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी तयार करणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी तयार करणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

3
SOPs to be prepared to prevent non-communicable diseases in children – Minister of State Meghna Sakore-Bordikar

मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

मुलांमधील असंसर्गजन्य आजार एक वाढती समस्या या विषयी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यशाळेस युनिसेफचे संजय सिंह, आरोग्य सेवा संचालक, डॉ. विजय कंदेवाड (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, ‘युनिसेफ’चे डॉ. मंगेश गाधारी उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, सृदृढ बालके आपल्या देशाचे भविष्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे आहे. मुलांमधील असंसर्गजन्य आजार याविषयी अधिक व्यापक जनजागृती होण्यासाठी अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल असेही त्यांनी सांगितले. राज्याचा आरोग्य विभाग व युनिसेफ यांच्यामार्फत आरोग्यदायी बालपण ही संकल्पना राबविण्यात येणार असून यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग व  पुढाकार महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, आधुनिक जीवनशैली, बदलती आहार पद्धती आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक ताणतणाव यासारखे असंसर्गजन्य आजार वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी  समाज, शाळा, पालक आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी महत्वाची आहे. आपल्या भागातील प्रत्येक बालक सृदृढ, निरोगी राहावे, ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावे यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यावर येणारे उपक्रम यशस्वीपणे राबिण्यावर भर देण्यात यावा. तसेच शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी शिबिरे, तंदुरुस्त बालपण मोहीम आयोजन, पौष्टिक आहार आणि शारीरिक क्रियाशीलतेबाबत जनजागृती आणि मुलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आधुनिक जीवनशैली, असंतुलित आहार आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, अस्थमा, मानसिक आरोग्य या समस्या आणि रक्तविकार झपाट्याने वाढत आहेत. भावी पिढीसाठी ही चिंतेची बाब असून  लोकप्रतिनिधी, शाळा, पालक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या आजाराविरुद्ध यशस्वी लढा देण्यात पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्याने  बाल मृत्यूदर कमी करण्यात देशाला दिशा दिली आहे. त्याचप्रमाणे बालकामधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी राज्याने दिशादर्शक असे काम करावे, अशी अपेक्षा युनिसेफचे डॉ. संजय सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.

किशोरवयीन मुलांमध्ये अस्थमा, लठ्ठपणा, मधुमेह वाढत आहे  असे सांगून डॉ. मृदला फडके म्हणाल्या असंसर्गजन्य आजारांबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. असंसर्गजन्य आजारात किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी युनिसेफचे डॉ. मंगेश गाधारी आणि  आरोग्य सेवा संचालक यांनीही मनोगत व्यक्त केले.