
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘विशेष कक्ष (Special Cell)’ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचा उद्देश असा की, समाजातील पारंपरिक बंधनांवर मात करून परस्पर संमतीने विवाह करणाऱ्या युवक-युवतींच्या सुरक्षेची आणि हक्कांची हमी शासनाने द्यावी.
या निर्णयानुसार नंदुरबार जिल्ह्यात मा. जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष कार्यरत करण्यात आलेला आहे. हा विशेष कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे स्थापन असून, तो आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आवश्यक ती सुरक्षा, सल्ला आणि तात्काळ मदत पुरवतो.
संपर्क साधण्यासाठी माहिती:
⦁ ई-मेल: sp.nandurbar@mahapolice.gov.in
⦁ दूरध्वनी क्रमांक: 02564–210100 / 110
⦁ आपत्कालीन प्रतिसाद सेवा: डायल 112
वरील माध्यमांद्वारे नागरिक, विशेषतः संकटग्रस्त तरुण-तरुणी, थेट पोलीस यंत्रणेशी संपर्क साधू शकतात. विवाहानंतर कोणत्याही प्रकारचा जिवीतास धोका निर्माण झाल्यास, त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा आपत्कालीन सेवा क्रमांक 112 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
न्यायालयाचा पार्श्वभूमी निर्णय:
रिट याचिका (दिवाणी) क्रमांक 231/2010 – शक्ती वाहिनी विरुद्ध भारत सरकार व इतर या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात स्पष्ट निर्देश दिले होते की, ‘आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्य सरकारांची असून, प्रत्येक जिल्ह्यात यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जावा.’
या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यांत या कक्षांची स्थापना करण्यात आली आहे, ज्याद्वारे सामाजिक पूर्वग्रहांमुळे धोक्यात आलेल्या तरुणांना कायदेशीर आणि सामाजिक आधार उपलब्ध करून दिला जात आहे.
समाजातील समरसतेकडे वाटचाल:
नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम समाजात सामाजिक सौहार्द, परस्पर आदर आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींना आपल्या वैयक्तिक निर्णयांचा आदर राखत सुरक्षितपणे आपले वैवाहिक जीवन जगता यावे, यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा एकत्रितपणे कार्यरत आहे.
#NandurbarPolice#CollectorOfficeNandurbar#SpecialCell#InterCasteMarriage#InterFaithMarriage#SocialHarmony#SafeNandurbar















