Home नंदुरबार जिल्हा डिझेल, पेट्रोल व  पेट्रोलियमसदृश द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक...

डिझेल, पेट्रोल व  पेट्रोलियमसदृश द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई

6
Strict action against those involved in unauthorized storage and sale of diesel, petrol and petroleum-like liquids

मुंबई : मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेच्या भरारी पथकामार्फत टागोर नगर, गुरुद्वाराजवळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई  या ठिकाणी डिझेल, पेट्रोल व पेट्रोलयमसदृश द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये पेट्रोल व डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स व टेम्पो असा एकूण रुपये 33,51,719/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  असल्याची माहिती  नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अतंर्गत कारवाई करुन संबंधित दोषींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम द्रव पदार्थ यांचे वितरण सुरळीत होणे तसेच त्यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याकरीता नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे मार्गदर्शनाखाली दक्षता पथक गठित करण्यात आलेले आहे. या दक्षता पथकामार्फत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

9 नोव्हेंबर 2025 रोजी टँकर क्रमांक MH 43 CE 6278 चे सील काढून अवैधरित्या टँकरमधील पेट्रोल काढून स्वत:च्‍या आर्थिक फायद्यासाठी काळ्याबाजारात परस्पर विक्री करत असल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट होत असल्याने अधिकारी व पंचासमक्ष केलेल्या कारवाईमध्ये टँकरचालक लालबहादुर रामनयन हरजन, टँकर क्लिनर पिंटू गौतम व सुखविंदर सिंग अजितसिंग सैनी व टँकर क्रमांक MH 43 CE 6278 चे मालक यांचेविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत (गुन्हा नोंद क्र 0594/2025) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये पेट्रोल व डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स व टेम्पो असा एकूण रुपये 33,51,719/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये काळाबाजार करणाऱ्यांचे विरुद्ध सहायक निरिक्षक शिधावाटप रामकृष्ण कांबळे यांनी विक्रोळी पोलिस ठाणे येथे फिर्याद नोंद केली. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालयाचे फिरते पथकातील मुख्य निरिक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप निरीक्षक सर्वश्री, विकास नागदिवे, राहुल इंगळे, देवानंद थोरवे, रामराजे भोसले, अमोल बुरटे, राजेश सोरते, रविंद्र राठोड, तसेच शिधावाटप कार्यालय क्र. 45 ई विक्रोळी येथील शिधावाटप अधिकारी नितीन धुमाळ, शिधावाटप निरिक्षक सर्वश्री निलेश भांडे, पंकज घोडेस्वार आणि विक्रोळी पोलिस ठाणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.