Home शेती नंदुरबारमध्ये २ दिवसीय कृषी संमेलनाची यशस्वी सांगता – कृषी विकास आराखड्यासाठी महत्त्वपूर्ण...

नंदुरबारमध्ये २ दिवसीय कृषी संमेलनाची यशस्वी सांगता – कृषी विकास आराखड्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा

2
Successful conclusion of 2-day agricultural conference in Nandurbar – Important direction for agricultural development plan

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी आणि प्रस्तावित ३ वर्षीय कृषी विकास आराखडा तयार करण्याच्या पूर्वतयारीत महत्त्वाचे पाऊल म्हणून मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली व मा. सीईओ नमन गोयल यांचे मार्गदर्शन अनुसार आयोजित करण्यात आलेल्या २ दिवसीय कृषी संमेलनाची आज यशस्वी सांगता झाली. या संमेलनात पाणी व्यवस्थापन, भरड धान्य उत्पादन, पशुधन व्यवस्थापन, तसेच शेती उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय निर्यात संधी या विषयांवर मार्गदर्शक तज्ज्ञांनी सविस्तर चर्चा केली.

🔹 प्रमुख मार्गदर्शक व विषय:

१. डॉ. पुरुषोत्तम वायाळ – जलतारा प्रकल्प (जलतज्ञ व समाजसेवक)

डॉ. पुरुषोत्तम वायाळ (स्वेच्छानिवृत्त प्राध्यापक, समाजसेवक, जलतज्ञ – जलतारा प्रकल्प) यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. वायाळ यांनी ‘पाणी अडवा – पाणी जिरवा’ या संकल्पनेवर आधारित लाईन ट्रीटमेंट, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे १८ प्रकार व एरिया ट्रीटमेंट (जलतारा पद्धती) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व, भूजल पातळीतील घट व शेतपुनर्भरण तंत्र, अतिवृष्टी व पाणीटंचाईमुळे होणारे पर्यावरणीय असंतुलन या समस्यांवर त्यांचे अनुभव कथन केले व चर्चात्मक उपाययोजनाही मांडण्यात आल्या.

२. श्री. महेश लोंढे – संस्थापक, Millet Adda

श्री. लोंढे यांनी भरड धान्य उत्पादनातील संधींवर चर्चा केली. मिलेट आधारित शेती ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे दालन ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.

३. श्री. अनिल भिकणे – पशुधन व्यवस्थापन तज्ज्ञ

श्री. भिकणे यांनी पशुधन व्यवस्थापनाच्या शास्त्रीय पद्धती व त्याचा शेती अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध याबाबत मार्गदर्शन केले.

४. श्री. राहुल खरातमल – कृषी उत्पादन निर्यात तज्ज्ञ

श्री. खरातमल यांनी शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी Import–Export व्यवसाय नोंदणी प्रक्रिया, B2B प्लॅटफॉर्मचा वापर, भारतीय दूतावास व परदेशातील एजंटमार्फत व्यवसाय संधी, शासकीय संकेतस्थळे, Data Providing Agencies व Yellow Pages चा वापर, LCL व FCL Cargo पद्धती, Marine व Cargo Insurance, Export Promotion Council व ECGC प्लॅटफॉर्म यासारख्या उपयुक्त मुद्द्यांवर माहिती दिली. याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून परदेशी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे तंत्रही त्यांनी स्पष्ट केले. या चर्चासत्रामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश घेण्यासाठी स्पष्ट दिशा मिळाली.

🔹 शेतकऱ्यांचा सहभाग:

याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या व त्यावरच्या उपाययोजना चर्चात्मक पद्धतीने मांडण्यात आल्या. कृषी संमेलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या नवकल्पना कागदावर मांडल्या. या संकल्पना जिल्ह्यासाठी प्रस्तावित ३ वर्षीय कृषी विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.

🔹 नियोजन:

या २ दिवसीय संमेलनाचे यशस्वी नियोजन मा. जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. चेतन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालय नंदुरबार यांनी केले. नियोजन विभागातून श्री. शशिकांत मराठे (KPMG सल्लागार व ‘महास्ट्राईड’ प्रकल्प जिल्हा समन्वयक) यांनी सहकार्य केले.

या संमेलनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन, पर्यायी पिके, पशुधन विकास व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश यासंबंधी ठोस दिशा मिळाली. जिल्ह्यातील शेती अधिक शाश्वत व नफ्याची व्हावी, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाला आहे.

#Nandurbar#AgricultureDevelopment#KisanVikas#WaterConservation#Millets#ExportOpportunities#PashudhanVikas#NandurbarKrushiSamellan#3YearAgriPlan#Mahastride