
नंदुरबार,
ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे (ता. शहादा) येथे दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी “परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्या एकत्रीकरणातून शाश्वत पर्यावरणीय भविष्यासाठी” या विषयावर भव्य आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सहभाग घेतला. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक व पर्यावरणपूरक उपक्रमांचा आढावा घेत, भविष्यात शाश्वत विकासासाठी प्रशासन, संस्था व नागरिकांनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित केली. स्थानिक पातळीवरील नियोजन, लोकसहभाग आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन हे शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. उलरिच बर्क (जर्मनी) यांनी अग्निहोत्राच्या माध्यमातून पर्यावरणातील सकारात्मक बदल कसे घडवून आणता येतात, याचे शास्त्रीय विश्लेषण सादर केले. तर सागर धारा (सल्लागार – UNEP) यांनी शाश्वत विकास प्रक्रियेत शासन, स्वयंसेवी संस्था व सामान्य नागरिकांची सामूहिक भूमिका किती निर्णायक आहे, यावर भर दिला.
यावेळी दीपक एस. पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा) यांनी आत्मा संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा मांडला. केदारनाथ कवडीवाले, अध्यक्ष – डॉ. हेडगेवार संस्था, नंदुरबार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब पी. बी. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. बी. व्ही. चौधरी यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी केले. एस. एस. दुथडे यांनी आभार प्रदर्शन केले, तर डॉ. योगेश पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
देशभरातून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून तज्ज्ञांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला. परंपरा व विज्ञान यांच्या समन्वयातून पर्यावरणपूरक आणि शाश्वत भविष्य घडविण्याच्या दृष्टीने हे चर्चासत्र दिशादर्शक ठरले.
#BamkhedaCollege#InternationalSeminar#SustainableDevelopment#TraditionalKnowledge#ModernScience#Environment#DrMitaliSethi#Nandurbar#GramVikasSanstha#ATMA#UNEP#GreenFuture















