Home शहादा शहादा येथे विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीवरील तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न

शहादा येथे विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीवरील तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न

0
Taluka-level teacher training on student-centric teaching methods concluded enthusiastically at Shahada.

शहादा(प्रतिनिधी):-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP- 2020), राज्य अभ्यासक्रम आराखडा-2024 तसेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहादा तालुक्यातील शिक्षकांसाठी विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती विषयक तालुकास्तरीय प्रशिक्षण नुकतेच पीएमश्री म्युनिसिपल न्यू इंग्लिश हायस्कूल, शहादा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात 332 तर दुसऱ्या टप्प्यात 420 अशा एकूण 752 शिक्षकांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांना विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची तत्त्वे, नवीन अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, अपेक्षित अध्ययन निष्पत्ती तसेच प्रभावी अध्यापन तंत्रांचा परिचय करून देणे हा होता.
प्रशिक्षणादरम्यान पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी डी. डी. राजपूत यांनी सदिच्छा भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा, क्षमता आणि शिकण्याच्या गतीनुसार अध्यापन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान वर्गात प्रभावीपणे वापरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौ. ममता पटेल व सचिन पाटील यांनीही प्रशिक्षणास भेट देऊन प्रशिक्षणाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. प्रशिक्षण समन्वयक माधवराव मोरे, विनोद चव्हाण तसेच केंद्रप्रमुख यांनी प्रशिक्षणाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
प्रशिक्षणामध्ये कृतीयुक्त अध्यापन, गीतांच्या माध्यमातून शिक्षण, शैक्षणिक खेळ, कथाकथन, भूमिकानाट्य, समूहकार्य, शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, अनुभवाधारित शिक्षण, समस्या निराकरण कौशल्य विकास, संख्याज्ञान विकास, सतत सर्वंकष मूल्यमापन तसेच विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणाऱ्या विविध अध्यापन पद्धतींचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय नवीन अभ्यासक्रमातील अध्ययन निष्पत्ती, भाषा कौशल्यांचा विकास, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी आवश्यक अध्यापन तंत्रे आणि वर्गातील प्रभावी नियोजन याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांनी विविध कृतींमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित विद्यार्थीकेंद्रित अध्यापन अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रशिक्षणांचा निश्चितच मोठा लाभ होणार असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यास या प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.