Home नंदुरबार जिल्हा आत्मा अंतर्गत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन...

आत्मा अंतर्गत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न

0
Terracotta bead and jewellery making training program inaugurated at Torcheda under Atma

कृषी विभाग आत्मा, नंदुरबार अंतर्गत तोरखेडा येथे ‘टेराकोटा मणी व दागिने निर्मिती’ या विषयावरील जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. हा उपक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण युवक-युवतींना कौशल्याधारित स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला.

Mahatma Gandhi Institute for Rural Industrialization, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षणात संस्थेचे तज्ज्ञ डॉ. राव व मनोज शर्मा यांनी मार्गदर्शन केले. गौरव कुचेवार व राजकुमार प्रजापती हे प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण देणार आहेत.

या प्रसंगी बामखेडे येथील ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयाचे सहायक व्याख्याते प्रा. एम. एस. निकुंभे, प्रा. डॉ. सुंदर पाडवी, सरपंच प्रतिनिधी मनीष गरुड, उपसरपंच परशुराम रामोळे, ग्रामसेवक जे. एस. गावित तसेच आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रवींद्र बच्छाव यांनी प्रशिक्षणाचा उद्देश व आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. राव यांनी पारंपरिक मासेमारीत वापरल्या जाणाऱ्या टेराकोटा मण्यांचा आकर्षक दागिन्यांमध्ये कसा उपयोग करता येतो, याचे तांत्रिक मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. मनोज शर्मा यांनी टेराकोटा मणी भट्टीमध्ये योग्य पद्धतीने भाजण्याची प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली.

यावेळी ग्रामविकास संस्थेची विद्यार्थिनी नर्गीस मण्यार हिने IIT Bombay व Maharashtra State Faculty Development Academy यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सादर केलेल्या टेराकोटा मणी निर्मितीच्या सादरीकरणाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तिच्या उपक्रमशीलतेमुळे या व्यवसायाची दखल घेतली गेली असून त्याच पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षणात गावातील ४० युवक-युवती सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश केसकर यांनी केले. प्रगतशील शेतकरी शिवदास रामोळे, रमण रामोळे, कैलास सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. एम. पाटील व ग्रामपंचायत संगणक चालक विलास सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण युवक-युवतींना पूरक उद्योजकतेचा मार्ग उपलब्ध होणार असून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

#atma#SkillDevelopment#terracottatraining#RuralEntrepreneurship#collectorofficenandurbar