Home शैक्षणिक संगणक कक्षाच्या उद्घाटनाने ठाणेपाडा शाळेचा डिजिटल प्रवास सुरू

संगणक कक्षाच्या उद्घाटनाने ठाणेपाडा शाळेचा डिजिटल प्रवास सुरू

0
Thanepada School's digital journey begins with the inauguration of a computer lab

नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, ठाणेपाडा येथे संगणक कक्षाच्या उद्घाटनाने शिक्षण क्षेत्रात एक नवे पाऊल टाकण्यात आले. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या शुभहस्ते आणि मा. सरपंच विशाल पवार यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मा. केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी यांनी केंद्रातील व ठाणेपाडा शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमांची आणि गुणवत्तावृद्धीच्या प्रयत्नांची माहिती दिली. तत्कालीन मुख्याध्यापक प्रकाश लांबोळे यांनी सन 2023-24 व 2024-25 मध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानातून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी केलेला प्रभावी वापर सादर केला.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली. शाळेच्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख करत त्यांनी ठाणेपाडा शाळेला ‘मॉडेल स्कूल’ म्हणून गौरविले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन ‘स्टार ऑफ द स्कूल’ म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश महारु चौधरी, मुख्याध्यापिका सुनंदा चौरे व शिक्षकवृंद यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य देवमन पवार, सेवानिवृत्त उपायुक्त यशवंत पवार, माजी जि.प. सदस्य जयंतीलाल घुगे, मा. शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील, मा. केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश महारु चौधरी, माजी अध्यक्ष श्री. दशरथ गावित, श्री. गणपत पवार तसेच शिक्षणप्रेमी श्री. गांगुर्डे सर, चैत्राम चौधरी, राजू घुगे, गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक व आष्टे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

मा. गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. श्री. गणेश चौधरी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

ठाणेपाडा शाळेचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणारा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

#QualityEducation#EducationDevelopment#collectorofficenandurbar#zillaparishadnandurbar