
या प्रसंगी मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात मराठी चित्रपटांनी आपली गुणवत्ता आणि वैविध्य सिद्ध करत राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. ‘शामची आई’, ‘नाळ २’ आणि ‘जिप्सी’ या चित्रपटांनी मराठी सिनेमाची श्रीमंती अधोरेखित करत विविध श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले. वर्ष २०२३ मधील उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू आणि निवड समितीचे सदस्य आशुतोष गोवारीकर, पी.शेषाद्री, गोपालकृष्ण पाय व्यासपीठावर उपस्थित होते.
‘सॅम बहादूर’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील तांत्रिक योगदानासाठी मराठी कलाकारांचा गौरव झाला. श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार आणि सचिन लवलेकर यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सॅम माणेकशॉ यांच्या व्यक्तिरेखेला जिवंत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांच्या ‘आत्मपँफ्लेट’ या चित्रपटाला दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा (इंदिरा गांधी) पुरस्कार मिळाला.