
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी, असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह तब्बल २२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त व बिझनेस प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे याच परिषदेत गुंतवणुकीचे तीन सामंजस्य करारही पार पाडण्यात आले.
येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन येत्या दोन-तीन महिन्यात विविध क्षेत्रांतील भविष्योन्मुख (फ्युचर रेडी पॉलिसी) धोरणे आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य शासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये जीसीसी पॉलिसी, जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी, बांबू पॉलिसी जाहीर केली आहे. नवे औद्योगिक धोरण आले आहे. त्यानंतर आता सात नवीन धोरणांची घोषणा येत्या दोन-तीन महिन्यांत होणार आहे. यामध्ये टेक्सटाइल्स अँड ॲपरल, लेदर अँड फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स अँड फॅब, एरोस्पेस अँड डीफेन्स, एमएसएमई, फार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल डीव्हायसेस, सर्क्युलर इकॉनॉमी, बायो प्लास्टिक या क्षेत्रांतील धोरणांचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ॲडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तीन महत्त्वाचे सामंजस्य करार झालेत. यामध्ये पहिला करार महामेट्रो आणि केअर हॉस्पिटलमध्ये झाला. या प्रकल्पातून सुमारे पंधराशे ते अठराशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.
दुसरा करार गॅलक्सी सोलर कंपनीसोबत झाला. कंपनीद्वारे १० हजार कोटींची गुंतवणूक करत सोलर सेल, बॅटरी स्टोअरेज सिस्टीमची निर्मिती होईल. या प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा सुमारे चार हजार रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.
तिसरा करार टेलिकॉम टॉवरची निर्मिती करणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरसोबत झाला आहे. कंपनीने २०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून याद्वारे सुमारे पाचशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.















