Home महाराष्ट्र लोकशाही उत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या मुंबईकरांच्या सेवेसाठी महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग तत्पर

लोकशाही उत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या मुंबईकरांच्या सेवेसाठी महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग तत्पर

0
The Public Health Department of the Municipal Corporation is ready to serve Mumbaikars who are participating in the democratic festival.

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवास प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिकांसह प्रथमच मतदार झालेले नव मतदार अत्यंत उत्साहाने या मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवीत आहेत. या मतदारांना आणि निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही वैद्यकीय गरज भासल्यास, वैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध व्हावी, या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याकरिता वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि संबंधित वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश असलेल्या १ हजार ६७४ चमू कर्तव्य तत्पर आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार व उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ३ हजार ३०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या चमू कार्यरत आहेत. तसेच गरज भासल्यास गरजू रुग्णाला तत्काळ रुग्णालयात नेणे सुलभ व्हावी, यासाठी ८० रुग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात आल्या आहेत. प्राथमिक वैद्यकीय सेवा सुविधेच्या दृष्टीने आवश्यक असणारी औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स इत्यादी देखील सर्व वैद्यकीय चमूंकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ हे देखील सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत कार्यरत आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालये इत्यादींना देखील वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने तत्पर राहण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींमुळे आणि करण्यात आलेल्या विविध स्तरीय नियोजनामुळे गरजूंना तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे, अशी ही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे देण्यात येत आहे.