भारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ हे राष्ट्रीय अभियान १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत (तेल आणि गॅस वाचवा, हरित ऊर्जा स्वीकारा)” या घोषवाक्यासह संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे त्यानिमित्त…
जागतिक पातळीवर वेगाने बदलणाऱ्या हवामानामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवासमोर आज मोठे आव्हान उभे राहिले आहे. पारंपरिक इंधनांचा वापर दिवसागणिक वाढत गेल्याने निसर्गावर मोठा ताण पडत असून, त्याचे दुष्परिणाम आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर ठळकपणे दिसू लागले आहेत. भविष्यात हे संकट आणखी भयावह होवू नये यासाठी समाजाने स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे प्राधान्याने वळणे, ही काळाची गरज बनली आहे.
कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारखी पारंपरिक इंधने मर्यादित स्वरूपाची आहेत. त्यांच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि इतर घातक वायू वातावरणात मिसळतात. यामुळे जागतिक तापमानवाढ, हवामानातील टोकाचे बदल, पावसाचे असमतोल स्वरूप तसेच आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. श्वसनविकार, हृदयविकार आणि त्वचारोग यांसारखे आजार याच प्रदूषणाशी थेट जोडलेले आहेत. यावर उपाय म्हणून नवी ऊर्जा क्रांती आकार घेत आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत, बायोगॅस, बायो-इंधन आणि हरित हायड्रोजन यांसारखे पर्याय आज प्रभावीपणे पुढे येत आहेत. या ऊर्जास्रोतांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे, ते अक्षय आहेत आणि पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवता. पवन ऊर्जा निर्मितीमुळे इंधन आयातीवरील खर्च कमी होऊन देशाची आर्थिक बचतही होते. ऊसाच्या चिपाडापासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाकडेही आपला देश गांभीर्याने पाहू लागला आहे.
अलीकडच्या काळाचा विचार केल्यास, वाहतूक क्षेत्रातही मोठे बदल होतांना दिसत आहेत. इलेक्ट्रिक वाहने, हायब्रिड वाहने आणि पर्यायी इंधनावर चालणारी वाहने यांचा वापर वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्राधान्याने स्वच्छ इंधनाचा समावेश केल्यास प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते. यासोबतच इंधन बचतीच्या सवयी, कार पूलिंग, सायकलचा वापर आणि पायी चालण्यास प्रोत्साहन देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
घरगुती पातळीवरही स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवता येऊ शकतो. सौर पॅनल्सद्वारे वीज निर्मिती, बायोगॅस प्रकल्प, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर आणि विजेचा अपव्यय टाळणे या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवू शकतात. शाश्वत जीवनशैली स्वीकारणे म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्याच्या दृष्टीने या ऊर्जा क्रांतिकडे पाहायला हवे.
या दिशेने केंद्र व राज्य सरकारांकडून विविध अभियानांद्वारे जनजागृती केली जात आहे. ‘सक्षम’सारख्या मोहिमा नागरिकांना पर्यायी इंधनांचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करत आहेत. उद्योग क्षेत्र, तसेच शहरे आणि ग्रामीण भागातही हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. यामध्ये संशोधन, नवतंत्रज्ञान आणि स्थानिक सहभाग आदिला विशेष महत्त्व दिले जात आहे.
स्वच्छ पर्यावरण हा केवळ सरकारचा किंवा एखाद्या संस्थेचा विषय नसून, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज प्रत्येक स्तरावर घेतलेले छोटे निर्णय उद्याच्या मोठ्या संकटांना टाळू शकतात. पर्यायी ऊर्जेचा वापर, इंधन बचत, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्यास हरित, सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी आपण भक्कम पायाभरणी करू शकतो. हीच खरी ऊर्जा क्रांती असून तिच्यात आपण सर्वांनी सहभागी होणे, ही काळाची गरज आहे.
















