
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत बैठक
नवी दिल्ली : विदर्भातील 11 आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) आणि मदर डेअरीच्या सहकार्याने दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नवी दिल्ली येथे झालेल्या या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन सचिव रामास्वामी एन, आयुक्त प्रवीणकुमार देवरे, एनडीबी चेअरमन डॉ. शहा, विदर्भ- मराठवाडा दुग्ध प्रकल्पाचे संचालक डॉ. बोरानी आणि डॉ. श्रीधर उपस्थित होते.
या बैठकीत शेतकऱ्यांना दूध संकलन, चारा लागवड आणि आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला. हा प्रकल्प दुग्धव्यवसायाला चालना देऊन शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचा ठरणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय, पशु प्रजनन पूरक खाद्य, दुधातील फॅट आणि SNF वाढवणारे खाद्य, बहुवार्षिक चारा पिकांसाठी अनुदान, मुरघास वाटप आणि विद्युत चलित कडबाकुट्टी सयंत्रांचे वाटप केले जाईल. शेतकऱ्यांना आधुनिक दूध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नागपूरमधील बुटीबोरीसह इतर ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश अतिरिक्त दूध संकलन, दुग्धविकास आणि दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे हा आहे.
या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दूध संकलनाचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून, शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यावरही भर देण्यात आला आहे.
या बैठकीनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या उपाययोजनांसह विविध विकासकामांसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना मागण्यांचे पत्र सादर केले.श्री गडकरी यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
000000000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष -225
एक्स वर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi / https://x.com/MahaMicHindi















