
नागपूर : जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे. महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. याअनुषंगाने शासनाच्या प्रत्येक अधिकारी-कर्मचार्यांनी जनतेचा सेवक या नात्याने आपली जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्यामकुमार बर्वे, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विकासकामांचा उल्लेख करताना पालकमंत्री श्री. बावनकुळे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सावनेर हे गाव आता सुरक्षा कवच असलेले गाव म्हणून नावारुपास आले आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीतून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले जात आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी सेव्ह लाईफ इंडियासोबत केलेल्या उपाययोजनांमुळे २०२५ मध्ये नागपूरच्या ग्रामीण भागात अपघात व मृत्यूंमध्ये घट होताना दिसत आहे. नागपूर शहर पोलीस आधुनिक तंत्रज्ञान आणि कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून शहर सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. अमली पदार्थ नियंत्रणासाठी ‘ऑपरेशन थंडर’, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर ओळखण्यासाठी ‘गरुड दृष्टी’ आदी उपक्रम राबविण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे पुढे म्हणाले.
नुकत्याच पार पडलेल्या दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाची नवी गाथा लिहिली आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी, शेतकरी, महिला, तरुणांसाठी, उद्योगासाठी जागतिक गुंतवणुक त्यांनी आणली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत वन ट्रीलियन करायची आहे. त्याची पायाभरणी होत आहे. आपली वाटचाल आता विकसित महाराष्ट्राच्या दिशेने सुरु आहे. नागपूर जिल्ह्याच्या विकासात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मेट्रो आणि परिवहनाच्या सुविधांवर लक्ष केंद्रीत केल्याने शहराचे रूप आंतरराष्ट्रीय होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
भारताच्या जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून सुरू होत आहे. ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे. घरगुती जनगणनेसाठी मोबाईल अॅप आणि केंद्रीय पोर्टलचा होणार आहे. आपण केवळ प्रजासत्ताक दिन साजरा करत नाही आहोत, तर विकासाच्या एका सुवर्णकाळाचे साक्षीदार होत असल्याचे ते म्हणाले.
राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण हाती घेतले आहे. अनेक वर्षापासून शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्त्याचा प्रलंबित प्रश्न आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेमुळे मार्गी लागत आहे. सुमारे 1 हजार 250 किलोमीटर रस्त्याला आपण जिल्हा नियोजन समिती निधी व मायनिंग अंतर्गत मंजूरी दिली आहे. या रस्त्यासाठी नागपूर जिल्ह्यात असलेल्या विविध थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या राखेवर प्रक्रिया करुन नवी मजबूती देण्याचा पथदर्शी प्रकल्प नागपूर जिल्ह्यात सुरु आहे. नागपूर शहरातील पंधरा झोपडपट्टींमधील 2 हजार 205 झोपडपट्टीधारकांना आपण अलिकडेच भाडेपट्टे वितरीत केले आहे. ग्रामीण व तहसील भागात आजवर एकूण 30 हजारांपेक्षा जास्त एवढे पट्टेवाटप झाले आहे. मनपा अंतर्गत खाजगी व मनपा पातळीवरील सुमारे 6 हजार पट्टे वाटप झाले आहेत. भविष्यातील नागपूरचा विस्तार लक्षात घेऊन सुमारे 148 किलोमीटर लांबीचा बाह्यवळण महामार्ग विस्तारीत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.नागपूर मनपाच्या विकासकामांचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला. नागपूर मनपाची वाहतूक व्यवस्था, नवीन इलेक्ट्रीक बसच्या मुबलक उपलब्धतेमुळे आणि मेट्रोच्या सुविधेमुळे एक भक्कम दळणवळण व्यवस्था उपलब्ध झाली आहे. सुरळीत वाहतुकीसाठी पीएम ई-बस सेवा असणार आहे. मनपा अंतर्गत प्रगतीचा आलेख पाहिला तर शहराच्या प्रगतीचा विस्तार झाला आहे. अमरावती रोडवरील तुरागोंदी, बुटीबोरी जवळील शिरुर, भंडारा रोडवरील पलसाड, आणि पारशिवनी जवळील इटगाव येथे नियोजीत ट्रान्सपोर्ट प्लाझातून औद्योगिक क्षेत्राच्या वाहतूक सुविधेला गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.
‘नवीन नागपूर’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र उभे राहणार
हिंगणा तालुक्यात ‘नवीन नागपूर’ अंतर्गत इंटरनॅशनल बिजनेस ॲण्ड फायनान्स सेंटर उभे राहणार आहे. शहराला ‘वाणिज्य केंद्र’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. जिल्ह्यातील गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवसखी उद्योगिनी योजना आणण्यात आली आहे. जिल्ह्यातील विकासकामांचा ओघ पाहता 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आपल्या भाषणादरम्यान कौतुक केले. विविध योजना व उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
उच्च न्यायालयात प्रजासत्ताक दिन साजरा
मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त न्या. मुकुलिका जवळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीतानंतर बँड पथकाने महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाला न्या. अनिल पानसरे, न्या. नितीन चांदवानी, न्या. निवेदिता मेहता, न्या. उज्वला फाळके, न्या. प्रफुल्ल खुबळकर, न्या. प्रवीण पाटील, न्या. नेरलिकर, न्या. राज वाकोडे, रजिस्ट्रार भूषण क्षीरसागर, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय सांबरे, उपाध्यक्ष ॲड. गणेश खानझोडे, सचिव ॲड. श्रीरंग भोंगाडे आदी उपस्थित होते.
जिल्हा न्यायालयात ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण उन्हाळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे, न्यायाधीश, वकील तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पोलीस विभागाच्या बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. यावेळी न्या. दिनेश सुराणा यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.















