गती आणि उत्तरदायित्व वाढविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत विविध प्रलंबित संसदीय आयुधांच्या डिजिटल पाठपुराव्यासाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक डॅशबोर्डचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानमंडळाचे सचिव-१ जितेंद्र भोळे, सचिव-३ विलास आठवले, सचिव-४ शिवदर्शन साठ्ये उपस्थित होते.
या डॅशबोर्डमुळे तारांकितप्रश्न, अतारांकितप्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्धा तास चर्चेच्या सूचना, विशेष उल्लेख, औचित्याचे मुद्दे आदी संसदीय आयुधांच्या प्रलंबिततेची रिअल-टाईम माहिती उपलब्ध होणार असून शासन आणि विधानमंडळ यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डिजिटल डॅशबोर्डमुळे संसदीय आयुधांच्या पाठपुराव्याची पारंपरिक कागदी पद्धत संपुष्टात येऊन संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार आहे. या डॅशबोर्डद्वारे आयुधांची सद्यस्थिती, प्रलंबित बाबी आणि विभागनिहाय माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. तसेच ‘कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे’ या समितीच्या कामकाजातही या प्रणालीचा प्रभावी उपयोग होणार आहे. मुख्य सचिव तसेच विविध मंत्रालयीन विभागांचे सचिव यांनाही त्यांच्या विभागातील प्रलंबित संसदीय आयुधांचा ऑनलाईन पाठपुरावा करता येणार असल्याने उत्तर सादर करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान आणि जबाबदार होईल. शासनाचे विधानमंडळाप्रती असलेले उत्तरदायित्व अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हा डॅशबोर्ड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.














