
तळोदा तालुक्यात तिहेरी अडचणींचा कहर
थंडीचा तडाका, पावसाचे प्रवाह आणि राजकीय अनिश्चितता – सर्वत्रच चर्चांना उधाण
तळोदा – तालुक्यात सध्या तिहेरी संकटाचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. थंडीचा जोर वाढल्याने कापूस फुटत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. दुसरीकडे, अवकाळीमुळे शेत रस्ते चिखलमय, तर नदी-नाले प्रवाहित असल्याने काठावरच्या शेतांतील ऊसतोडणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत आणि मिळाले तरी पाण्यामुळे शेतात प्रवेश करणे कठीण झाले आहे.
दरम्यान, या नैसर्गिक अडचणींमध्येच तळोदा शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या राजकारणाने तापमान आणखी वाढवले आहे. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे परंतु युती होणार की नाही तसेच नगरसेवक पदासाठी कोणाला तिकीट मिळणार, हे अद्याप स्पष्ट न झाल्याने शहरभर चर्चांना उधाण आले आहे. पक्षांमध्ये गोंधळ, इच्छुकांची गर्दी आणि गटबाजीमुळे अधिकृत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचा उमेदवार ठरत नाही, अशी चहू बाजूने चर्चा सुरू आहे.
कापूस फुटत नाही… ऊस तुटत नाही… आणि अधिकृत नगराध्यक्षही ठरत नाही!
तळोद्यातील नागरिकांमध्ये हेच तीन वाक्य चर्चेचा मुख्य विषय बनले आहेत.
शेतकरी हवामानाच्या अडचणीत तर राजकीय पक्ष निर्णयाच्या अडचणीत अडकलेले दिसत आहेत. दोन्ही आघाड्यांवर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. आगामी काही दिवस हवामान आणि राजकारण — दोन्हींचा तळोद्यातील घडामोडींवर मोठा परिणाम होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















