
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, माजी मुख्यमंत्री तथा ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ.गीताली टिळक, डॉ. प्रणति टिळक उपस्थित होते.
नितीन गडकरी हे केवळ ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन आफ ॲक्शन’ आहेत. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे अफाट कार्य त्यांनी केले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करणे हा एका कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तीमत्त्वाचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.
लोकमान्य टिळकांचा स्वाभिमानी बाणा आधुनिक भारतामध्ये ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा ही संकल्पनाच अतिशय विलक्षण आहे. लोकमान्यांचा हा बाणा नितीन गडकरी यांच्या अंगी ठायी-ठायी दिसतो. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे त्यांचे नेतृत्व आहे. विलक्षण प्रतीभा त्यासोबत संवेदनशीलता आणि सातत्याने समाजकारणाची प्रेरणा देणारे संस्कार त्यांनी जोपासले आहेत. ते चांगले संशोधक आहेत. कृषी, अभियांत्रिकी, वैद्यक, उद्योग, स्थापत्य आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अफाट आहे. नवनवीन बाबींकडे ते आकृष्ट होतात. या बाबी सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचता येतील असा त्यांचा प्रयत्न असतो, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
लोकमान्य टिळक हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्त्रोत आणि आदर्श आहेत. त्यांचे कर्तृत्व खऱ्या अर्थाने व्यासंगी आहे. त्यांच्या नावाने असणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही सन्मानाची बाब आहे. या सन्मानामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली असून लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी येणाऱ्या काळात देशासाठी अधिक जोमाने काम करेन, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सत्काराला उत्तर देतांना दिली.