
शहरांच्या भविष्यासाठी आज निर्णय घ्या, पुढील ५० वर्षांचा विचार करून प्रकल्प राबवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. महाराष्ट्रातील शहरी भागांच्या पायाभूत विकासासाठी राज्य शासनाच्या #महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड (MUINFRA) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नवीन आर्थिक आराखड्यावर चर्चा करताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.
शहरांमधील मलनिस्सारण, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी फक्त आजचे नव्हे, तर पुढील पिढ्यांचा विचार करून नियोजन करा. पाणी, कचरा व्यवस्थापन, वाहतूक यासाठी स्वतंत्र आराखडे आणि यावर लक्ष केंद्रीत करा, निव्वळ निधी पुरवठा न करता, रिसोर्स प्लॅनिंगवर भर द्या. जेथे फंडीग गॅप आहे, तिथे पूरक व्यवस्था करून प्रकल्प साकारा, स्थानिक संस्थांना पायाभूत प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य दिले पाहिजे आणि उभारलेल्या सुविधांचे मॉनिटरिंगही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी बैठकीस जागतिक बँक टास्क फोर्सचे अबेद खालील, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, नगर विकासाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता उपस्थित होते.















