(नंदुरबार) कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार सन 2026 च्या खरीप हंगामात ‘एल निनो’ (El Nino) हवामान घटकामुळे नंदुरबार जिल्ह्यात तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आत्तापासूनच पूर्वतयारी व सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
‘एल निनो’ या जागतिक हवामान बदलामुळे भारतीय मोसमी पाऊस उशिरा आणि कमी येतो, ज्याचा थेट फटका खरीप हंगामाला बसतो. नंदुरबार जिल्ह्यात जून-जुलैमध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची आणि सरासरी पर्जन्यमान घटण्याची भीती आहे. यामुळे कापूस, मका, सोयाबीन, भात आणि तूर या मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. तसेच विहिरी, बोअरवेल आणि तलावांमधील पाणीसाठा आटून सिंचन ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे . जिल्ह्यातील अक्राणी व अक्कलकुवा या दुर्गम आदिवासी तालुक्यांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी खालील तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत.
• मूलस्थानी जलसंधारण: पावसाचे पाणी शेतातच मुरवण्यासाठी उताराला आडवी नांगरणी व मशागत करावी. समतल पातळी पेरणी, रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी पिकांच्या मुळाशी आच्छादन (Mulching) वापरावे .
• शेततळे व प्लास्टिक अस्तरीकरण: दुष्काळात पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पावसाचे अतिरिक्त पाणी शेततळ्यात साठवावे. यासाठी शासकीय अनुदान उपलब्ध असून शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
• क्षेत्र व नाला उपचार: कृषी विभागामार्फत शिवार फेरीद्वारे सलग समपातळी चर (CCT), ढाळीचे बांध, शेत शोषखड्डे, सिमेंट व मातीचे नाला बांध आणि वनराई बंधारे उभारणीचे उपक्रम राबवले जाणार आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.
• पीक नियोजनात बदल: कमी पाण्यात येणाऱ्या आणि दुष्काळास तग धरणाऱ्या पीक वाणांची निवड करावी आणि यासाठी कृषी सहाय्यकांचे मार्गदर्शन घ्यावे.
संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान, आदर्शगाव योजना आणि मनरेगा (MGNREGA) या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्याशी संपर्क साधावा असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
















