
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार व जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या संकल्पनेतून उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘महिला उद्योजक संवाद २०२५’ हा जिल्हास्तरीय संवाद कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकतेकडे प्रेरित करणे, त्यांच्या यशस्वी प्रवासातील अनुभव ऐकून नव्या उद्योजक महिलांना मार्गदर्शन मिळवून देणे हा होता. ‘महिलांचा उद्योजकतेकडे प्रवास – अनुभव, प्रेरणा आणि मार्गदर्शन!’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाने जिल्ह्यातील महिला उद्योजकतेच्या चळवळीला नवी दिशा दिली.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद नंदुरबारचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल, मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत पवार, मा. जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. यशवंत ठाकूर, तसेच विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांनी मार्गदर्शक मनोगत व्यक्त करताना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि उद्योजकतेचा ग्रामीण विकासाशी असलेला संबंध अधोरेखित केला.
यानंतर दोन्ही मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या महिला उद्योजकांच्या उत्पादन प्रदर्शन स्टॉलना भेट देऊन उत्पादक महिलांशी संवाद साधला आणि काही स्थानिक उत्पादने खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमाने महिलांच्या उत्साहात दुणावणी केली आणि जिल्हा प्रशासनाच्या “स्थानिकाला प्राधान्य” या दृष्टिकोनाचा प्रत्यय दिला.
महिला उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा:
कार्यक्रमादरम्यान महिला स्वयं सहायता गटांच्या उद्योजक प्रवासावर आधारित लघु व्हिडिओ सादर करण्यात आले, ज्यांनी उपस्थित सर्वांना प्रेरित केले.
⦁ नर्मदा महिला स्वयं सहायता समूह, खडक्या (ता. धडगाव) – स्थानिक ‘महू’ उत्पादन दिल्लीपर्यंत पोहोचविण्याची यशस्वी कहाणी.
⦁ श्रीमती काथूबाई गावित, बोरचक (ता. नवापूर) – मध उत्पादनातील ‘मधाची गोष्ट’.
⦁ श्रीमती थावली पावारा, कुसुमवेरी (ता. अक्कलकुवा) – ग्रामीण महिलांसाठी उपजीविकेच्या नव्या संधी.
⦁ श्रीमती आशाताई पाटील, बोराळा (ता. नंदुरबार) – PMFME/CMEGP योजनेंतर्गत संकटावर मात करून व्यवसायाची सुरुवात.
⦁ श्रीमती मयुरी चौधरी, समशेरपूर (ता. नंदुरबार) – ‘खाखरा उद्योगाची गोष्ट’.
⦁ वीर एकलव्य आदर्श महिला प्रभाग संघ, गणोर (ता. शहादा) – प्रभागसंघाच्या आदर्श कार्याची झलक.
⦁ शिवशक्ती महिला स्वयं सहायता समूह, तळोदा – हळद व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा प्रवास.
मान्यवरांचे मार्गदर्शन सत्र:
कार्यक्रमात विविध विभागांतील अधिकारी व तज्ज्ञांनी महिलांसाठी उपलब्ध संधी आणि योजनांबाबत मार्गदर्शन केले:
⦁ श्री. गणेश पठारे, संचालक, RSETI – ‘महिलांसाठी प्रशिक्षणाचे माहेरघर’
⦁ श्री. राजेंद्र दहातोंडे, प्राचार्य, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा – ‘शेती व्यवसायातील महिलांसाठी नव्या संधी’
⦁ श्री. सुहास कोतकर, मुख्य प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक – ‘महिलांसाठी वित्तीय सेवा’
⦁ श्री. एस. एस. गवळी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र – ‘महिलांसाठी उद्योगविकास योजना’
⦁ श्री. विजय मोहिते, जिल्हा नोडल अधिकारी, PMFME योजना – ‘PMFME योजनेची माहिती’
⦁ श्री. दीपक पटेल, प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय – ‘महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संधी’
⦁ श्री. उमेश अहिरराव, जिल्हा व्यवस्थापक, आर्थिक समावेशन – ‘महिलांसाठी आर्थिक संधी’
⦁ श्री. दीपक शर्मा, D.C., Central Bank – ‘महिला बचत गटांसाठी कर्ज आणि उद्योग सहाय्य’
उमेद अभियानाचा प्रवास:
उमेद अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये ग्रामीण भागातील गरिबांच्या सामाजिक, आर्थिक आणि वित्तीय समावेशनासाठी करण्यात आली. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, नंदुरबार, नवापूर व तळोदा या तालुक्यांमध्ये उमेद अभियानाने महिलांच्या स्वयं सहायता गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाची पायाभरणी केली आहे. महिलांच्या बचत गटांना प्रशिक्षण, बाजारपेठ आणि योजनांचा लाभ देत ‘उद्योजकतेकडे प्रवास’ हा संकल्प पूर्णत्वाकडे नेला आहे.
‘महिला उद्योजक संवाद २०२५’ हा केवळ एक कार्यक्रम नव्हता — तर ग्रामीण महिलांच्या सशक्ततेच्या दिशेने उचललेले एक ठोस पाऊल होते. जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महिलांच्या उद्योजकतेकडे वाटचालीला नवे बळ मिळाले आहे.
#महिला_सशक्तीकरण#UmedAbhiyan#CollectorOfficeNandurbar#WomenEntrepreneurs#Nandurbar















