
भारतातील सर्वात मोठी १० गिगावॅट क्षमता असलेला हा प्रकल्प सौर क्षेत्रासाठी अधिक स्थिर देशांतर्गत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सौरऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वारी एनर्जीज्चे अध्यक्ष हितेश दोशी, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार समीर मेघे, माजी खासदार अजय संचेती, वारी एनर्जीज्चे विरेंद्र दोशी, अंकीत दोशी, करण दोशी तसेच उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी, अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा प्रकल्प ६ हजार २०० कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह ३०० एकरांवर विकसित होत आहे. यामुळे २ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. संपूर्ण प्रकल्पात ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून संपूर्ण क्षमता निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मितीस प्राधान्य देण्यात येत आहे. एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन चीननंतर या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर येथे सुरु होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात ७ प्रकल्प मंजूर केले असून त्यापैकी ४ प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी ३ प्रकल्पांचे भूमिपूजन झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा देण्यासाठी कटिबद्ध आहे. थर्मल पॉवरमुळे निर्माण होणारे प्रदूषण टाळण्यासाठी ३०० कोटींहून जास्त झाडे लावावी लागतील. परंतु, सौरऊर्जेतून प्रदूषण व पर्यावरण संतुलनास मदत होणार आहे. सौरऊर्जा निर्मितीमुळे ९ टक्क्यांपेक्षा जास्त वीजदर कमी होणार आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस















