Home आरोग्य सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय...

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण

0
Striving to provide quality healthcare services to common citizens – Guardian Minister Chandrakant Patil dedicates healthcare services at Government Medical College Miraj

सांगली : शासकीय रूग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री व मनुष्यबळ देऊन आरोग्यसेवा अद्ययावत करण्यात येत आहेत. गोर गरीब, सामान्य नागरिकांना मोफत किंवा माफक दरात चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन व जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची कमतरता भासू देणार नाही. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुनेही मिशन मोडवर काम करून लोकांना आरोग्याची चांगली सेवा द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या निधीतून मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील अत्याधुनिक बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन व अत्याधुनिक शवविच्छेदन विभाग या कामाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुहास बाबर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे उप अधिष्ठाता श्रीकांत अहंकारी, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, वैद्यकीय अधीक्षक प्रियांका राठी, वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोविडच्या साथीमुळे वैद्यकीय सुविधा अद्ययावत व वाढवण्याची गरज तसेच जीवन किती क्षणभंगूर असल्याचे लक्षात आले. जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विकास कामे केली जातात. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून लोकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच माध्यमातून आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे अत्याधुनिक बर्न आय.सी.यु., सोनोग्राफी, अत्याधुनिक शवविच्छेदन विभाग या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईक येत असतात. त्यांचीही राहण्याची व्यवस्था उभी केली जाईल. बराच काळ अंथरुणावर असणाऱ्या रुग्णांसाठी सुविधा त्याचबरोबर रुग्णालय परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माफक दरात जीवनावश्यक सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले.आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. अनेक सोयी सुविधा पुरविल्या आहेत. रुग्णालय प्रशासनही चांगले काम करीत आहे. गोरगरीब जनतेला वरदान ठरेल असे काम करण्यात आले आहे. हे रुग्णालय मल्टीस्पेशालिटी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ते यावेळी म्हणाले. प्रास्ताविकात वैद्यकीय उपअधिक्षक रूपेश शिंदे यांनी जिल्हा वार्षिक योजनेमधून रुग्णालयास पुरवण्यात आलेल्या विविध सोयीसुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शवविच्छेदन विभाग, सोनोग्राफी, अत्याधुनिक बर्न आय.सी.यु. येथे प्रत्यक्ष भेट देऊन पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन विभाग, सोनोग्राफी, अत्याधुनिक बर्न आय.सी.यु. या विभागाचे अद्ययावतीकरण करण्यापूर्वीच्या सुविधा व अद्ययावतीकरणानंतरच्या निर्माण झालेल्या सुविधा चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या.

अत्याधुनिक बर्न विभाग
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे अत्याधुनिक बर्न विभाग नसल्यामुळे जळीत / भाजलेले रुग्णांना सांगली सिव्हिल येथे उपचार घ्यावे लागत होते. आता अत्याधुनिक बर्न विभाग झाल्याने व जिव वाचविण्याचे प्रमाण वाढणार आहे. याचा फायदा गोर गरीब जनतेला होणार आहे व सर्व उपचार हे मोफत असल्याने लोकांच्या लाखो रुपयांची बचत होणार आहे.

सोनोग्राफी सेंटर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खुप वाढत चालली आहे. दररोज ओ. पी. डी. मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे तर आंतररुग्ण विभागामध्ये रुग्णांची संख्या 350 पेक्षा जास्त झालेली आहे. त्यातील बरेच रुग्णांची निदान करण्यासाठी अत्याधुनिक सोनोग्राफी मशिनची गरज लागते. आता प्राप्त दोन अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनमुळे गुंतागुंतीचे निदान करणे सोपे झालेले आहे. गरोदर स्रिया तसेच इतर महिला यांचे अॅनोमली स्कॅन विविध आजार, नवजात शिशुनां काही धोका असेल तर निदान करणे सोपे झालेले आहे. त्याबरोबर यकृत, किडणी, फुफ्फुस, पोटाचे विकार यांचे निदान करणे हे देखील सोईचे झाले आहे. याचा फायदा गोर गरीबांना होत आहे.

अत्याधुनिक शवविच्छेदन विभाग
यापूर्वी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या शवविच्छेदन विभागामध्ये 5 ते 6 जुने शितगृह उपलब्ध होते व मशीन जुने असल्यामुळे वारंवार बंद पडत होते. त्यामुळे येणाऱ्या मृत रुग्णांना ठेवणे अवघड झाले होते. आता शवविच्छेन विभाग अत्याधुनिक झाल्यामुळे 25 ते 30 मृत शव ठेवणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक सुविधा झाल्याने शव पासून येणारी दुर्गेची तसेच संसर्ग होणार नाही. त्याचप्रमाणे हे वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थी व शिकाऊ डॉक्टरांना शवविच्छेदन बघण्यासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण झाली आहे.