Home नंदुरबार जिल्हा संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज

0
Nandurbar District Administration ready to deal with possible natural disasters

(नंदुरबार) येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले. आज जिल्हा नियोजन सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.

बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती अश्विनी सानप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तळोदा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर, आदि जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

गोमाई पुलाचे काम जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश

बैठकीत प्रामुख्याने शहादा येथील गोमाई नदीवरील पुलाच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. पुलाच्या पायाचे पाण्यातील काम जून महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच पुलावर अवजड वाहनांच्या प्रतिबंधासाठी ‘सी’ टाईप कमान बसवणे आणि पर्यायी वाहतुकीचे फलक लावण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

आरोग्य आणि संपर्क व्यवस्थेवर भर

दुर्गम भागात पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांची नवीन यादी तयार करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा ठिकाणी औषधसाठा, प्राथमिक आरोग्य किट आणि प्रसूतीसाठी विशेष व्यवस्था ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी सॅटेलाईट फोन आणि पोलीस वायरलेस यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

धरणे आणि पूर नियंत्रण

प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील अधिकाऱ्यांनी तापी नदीच्या पाणी पातळीचा इशारा शहादा व नंदुरबार तहसीलदार आणि नियंत्रण कक्षाला नियमित द्यावा, असे सांगण्यात आले. उकाई धरणातून पाणी सोडण्यापूर्वी समन्वय ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पत्राद्वारे कळविण्याचे निर्देश दिले, जेणेकरून जिल्ह्यात पुराची परिस्थिती निर्माण होणार नाही.

प्रमुख विभागांना दिलेल्या महत्त्वाच्या सूचना:

• पोलीस विभाग: आपत्तीच्या वेळी प्रतिसादासाठी 24X7 विशेष पथके तैनात ठेवावीत.

• कृषी विभाग: शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज वेळोवेळी द्यावा आणि पावसाची नोंद नियमित करावी.

• महावितरण: धोकादायक खांब आणि तारांवरील फांद्या त्वरित काढून वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी.

• नगरपालिका व पंचायत समिती: नाले सफाई आणि पाण्याचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करून स्थलांतरासाठी निवारा केंद्रे सज्ज ठेवावीत.

• शिक्षण विभाग: ज्या शाळांचा वापर निवारा केंद्रासाठी होणार आहे, त्यांची दुरुस्ती करून घ्यावी.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाई बाबत प्रत्येक तालुक्यानिहाय नगरपालिका मुख्याधिकारी यांचा आढावा घेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.