
सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देश त्यांनी यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रत्येक वर्षी नवी आव्हाने घेऊन येणाऱ्या मॉन्सूनच्या मागील अनुभवांच्या आधारे अधिक सक्षम तयारी करणे आवश्यक आहे. कागदावरील नियोजन न ठेवता सर्व विभागांनी मानक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी. यंत्रणांचा तातडीचा प्रतिसाद, वेळेत इशारे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत जलद मदत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील १५ दिवसांत सर्व विभागांनी तयारीची पुन्हा पडताळणी करून त्रुटी दूर कराव्यात. मंत्रालय, पोलीस, महानगरपालिका व विविध नियंत्रण कक्षांचे एकत्रीकरण करून एकात्मिक प्रतिसाद प्रणाली उभारावी. मॉन्सूनमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांना जास्तीत जास्त दिलासा द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी आपत्ती व्यस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते. मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व सर्व महसूली विभागांचे विभागीय आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.















