Home महाराष्ट्र ‘पु.ल. कट्टा’ उपक्रमाच्या वर्षपूर्ती निमित्त १२ जून रोजी पुलंच्या साहित्याची अक्षरमैफल

‘पु.ल. कट्टा’ उपक्रमाच्या वर्षपूर्ती निमित्त १२ जून रोजी पुलंच्या साहित्याची अक्षरमैफल

0
‘पु.ल. कट्टा’ उपक्रमाच्या वर्षपूर्ती निमित्त १२ जून रोजी पुलंच्या साहित्याची अक्षरमैफल
A literary gathering celebrating Pu.La.’s works, marking the first anniversary of the ‘Pu.La. Katta’ initiative on June 12.

मुंबई : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून  सुरू करण्यात आलेल्या ‘पु. ल. कट्टा’ या अभिनव उपक्रमाला १२ जून २०२६ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त १२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे ‘अक्षरमैफल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या निवडक पत्रांचे आणि लेखांचे अभिवाचन प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे, प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, मीना नाईक, उत्तरा मोने करणार आहेत.

१२ जून २०२५ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाने अवघ्या एका वर्षात कलाकार आणि रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कला, साहित्य, संगीत, नाट्य, अभिवाचन, सुलेखन, चर्चासत्रे, लोककला आणि विविध सांस्कृतिक अभिव्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणत ‘पु. ल. कट्टा’ खऱ्या अर्थाने कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ ठरला आहे.

गेल्या वर्षभरात या कट्ट्यावर अनेक मान्यवर कलाकार, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार आणि साहित्यिकांनी उपस्थिती लावली. त्याचबरोबर अनेक नवोदित कलाकारांनाही आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ‘पु. ल. कट्टा’ हा केवळ कार्यक्रमांचा मंच न राहता नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणारे आणि विविध कलाप्रकारांना जोडणारे एक समृद्ध सांस्कृतिक केंद्र बनले आहे.

या वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांनी रसिकांना वैचारिक आणि कलात्मक मेजवानी दिली. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते उपेंद्र दाते यांच्यासोबत झालेल्या ‘नवा नटसम्राट’ या विशेष संवाद कार्यक्रमात त्यांच्या कलाप्रवासातील अनुभव, अभिनय क्षेत्रातील संघर्ष आणि पडद्यामागच्या अनेक आठवणी उलगडल्या. ‘अक्षरांचे संगती’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात पद्मश्री अच्युत पालव यांच्या सुलेखन कलेचा आणि प्रसाद फणसे यांच्या आवाजाच्या जादूचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. अक्षर, रेषा आणि स्वर यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर यांच्या गाजलेल्या लेखनावर आधारित ‘वेचक कणेकरी’ या कार्यक्रमात त्यांच्या निवडक लेखांचे अभिवाचन, किस्से आणि गप्पागोष्टी रंगल्या. साहित्यप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा ठरला. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्य विभागाच्या दुर्मिळ नाटक जतन योजनेअंतर्गत सादर झालेल्या जयवंत दळवी लिखित ‘मुक्ता’ आणि मधुसूदन कालेलकर लिखित ‘झुंज‘ या नाटकांचं ध्वनिचित्रमुद्रण ही रसिकांसाठी एक आगळी मेजवानी ठरली. या नाटकांच्या प्रयोगानंतर कलाकारांशी झालेल्या मुक्त संवादाने रंगभूमीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेतील महान सुरबहार वादिका विदुषी अन्नपूर्णादेवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘A-6 आकाशगंगा’ या विशेष कार्यक्रमाने संगीत रसिकांना एक वेगळाच अनुभव दिला. अन्नपूर्णादेवींचे विचार, त्यांचे गुरुतत्त्व आणि संगीत क्षेत्रातील योगदान यांचा उहापोह या कार्यक्रमातून करण्यात आला. तर ‘जादू अशी घडे ही…’ या सुरेल मैफिलीत हिंदी आणि मराठी प्रेमगीतांनी सजलेली बहारदार संगीत मैफल रंगली. युवा गायक आणि वादक कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांची मनं जिंकली.

या सर्व कार्यक्रमांमधून ‘पु. ल. कट्टा’ने विविध कलाशाखांना एकत्र आणण्याचे आणि कलाकार-रसिक यांच्यात थेट संवाद घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. ज्येष्ठ कलाकारांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा लाभ नवोदितांना मिळाला, तर नव्या पिढीतील कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.

‘कलेचा आनंद, विचारांची मेजवानी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत ‘पु. ल. कट्टा’ने अवघ्या एका वर्षात सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कलाकार आणि रसिक यांच्यातील हा सांस्कृतिक सेतू पुढील काळातही अधिक व्यापक आणि समृद्ध होत राहील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here