महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.
आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी पैशांअभावी गरिबांचे उपचार थांबू नयेत, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. हे महाआरोग्य शिबिर गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सर्वांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतले. रुग्णालयांची संख्या वाढवली. राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’त यापूर्वी जे गंभीर आजार नव्हते, ते समाविष्ट केले. गेल्या दीड वर्षात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षा’तर्फे ५७ हजार रुग्णांना ४५२ कोटी रुपये उपचारांसाठी उपलब्ध करून दिले. सर्व धर्मादाय रुग्णालयातील खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव असल्या पाहिजे, यासाठी डिजिटल पद्धती निर्माण केली. जवळपास १० आजार असे आहेत की जे योजनेच्या ५ लाख रुपयांच्या मर्यादेत बसू शकत नाही, त्यामुळे त्यासाठी ९ लाखांपर्यंत, तर काही आजारांच्या बाबतीत ३५ लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचे शासनाचे धोरण आहे. मूकबधीर मुलांची समस्या लक्षात घेत लहान मुलांसाठी कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया निःशुल्क सुरु केल्या. दिव्यांग बांधवांना येत्या ९ ऑगस्ट रोजी कृत्रिम पाय, हातांचे वितरण केले जाणार आहे. सेवा हाच आमचा धर्म आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा होत आहे. कॅन्सरवरील काही कॅप्सूल, इंजेक्शन यांचा असलेला प्रचंड खर्च कमी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न करावेत – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अनेक संस्थांतर्फे यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरला देणगी आणि रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. हे सर्व दाते तसेच महाशिबिराच्या आयोजनात सहभागी डॉक्टरांचा सत्कार यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अजित गोपछडे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, संजय भेंडे, मोहन मते, राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
















