Home नंदुरबार जिल्हा कारगिलविजयदिवस निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या...

कारगिलविजयदिवस निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वीरसैनिक

1
On the occasion of Kargil Vijay Diwas, a program honoring brave soldiers was held at Lok Bhavan under the aegis of the Directorate of Cultural Affairs, in the distinguished presence of Governor Jishnu Dev Varma.

माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञता-सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन, लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, पोलीस महासंचालक सदानंद दाते, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच वीरसैनिक, वीरमाता, वीरपत्नी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृतिदिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. या दिवसातून प्रत्येक नागरिकाने ‘राष्ट्र प्रथम’ हा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारून एकसंघ, सक्षम आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

कारगिलमधील प्रत्येक शहीदामागे एक वीरमाता, वीरनारी आणि राष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग करणारे कुटुंब उभे आहे. अशा कुटुंबांप्रती संपूर्ण राष्ट्र कृतज्ञ असून, त्यांच्या सन्मानासाठी आणि कल्याणासाठी समाजाने सातत्याने सहभागी व्हावे. तसेच, नव्या पिढीने कारगिल युद्धाचा इतिहास जाणून घेत भारतीय सशस्त्र दलांच्या समर्पणाची जाणीव ठेवावी, असेही राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारतीय स्थलसेना, नौदल आणि वायुसेनेच्या नेतृत्वासह सर्व सैनिकांच्या राष्ट्ररक्षणातील अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले.

कारगिल युद्धातील भारतीय जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेले शौर्य हे जगाच्या युद्धइतिहासातील अतुलनीय उदाहरण असून, भारताच्या इतिहासात कारगिलचे वीर कायम अजरामर राहतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शहीदांच्या बलिदानाचे मोल पैशात होऊ शकत नसले, तरी राज्य शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कायम उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे ऋण १४० कोटी भारतीय कधीही फेडू शकणार नाहीत. शहीद जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नींचा त्याग हा देशाचा खरा स्वाभिमान असून, त्यांचा सन्मान करणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे शौर्य आणि त्याग हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असून, वीरसैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि दिव्यांग सैनिकांचा सन्मान करणे ही संपूर्ण समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

#KargilVijayDiwas