Home सरकारी योजना ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या आषाढी दिंडी सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या आषाढी दिंडी सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

1
Overwhelming response from devotees to the Ashadhi Dindi procession organized by the Om Gurudev Railway Passengers' Bhajan Mandal.

नालासोपारा(प्रतिनिधी):-ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ, मोरेगाव, नालासोपारा स्थापना सन 2000 नोंदणी क्र. महा 5561/ 2022, पालघर मंडळाच्या वतीने आयोजित आषाढी दिंडी सोहळा शनिवार, 25 जुलै 2026 रोजी अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. दिंडीची सुरुवात विरार येथून सकाळी 8.40 वाजताच्या लोकलने झाली. संपूर्ण रेल्वे प्रवासात टाळ- मृदुंगाच्या गजरात “राम कृष्ण हरी” व श्री विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरू होता. या हरिनामाच्या वातावरणात  अनेक प्रवासीही भक्तिरसात तल्लीन झाले.
चर्चगेट येथे पश्चिम रेल्वे श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था यांच्या वतीने दिंड्यांचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित रिंगण सोहळ्यात हजारो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर दुमदुमला आणि संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
यानंतर चर्चगेट येथून दिंडी दहिसर (पूर्व) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे प्रस्थान झाली. संपूर्ण मार्गावर विठ्ठल नामाच्या अखंड गजरात वारकरी भक्तिभावाने सहभागी झाले. मंदिरात श्री विठ्ठल -रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी पुढे निघाली. या सोहळ्यास सहायक पोलीस आयुक्त अनिल रामचंद्र आव्हाड (शस्त्रास्त्र विभाग, मुंबई पोलीस मुख्यालय) तसेच ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम पुंजाजी घुगे यांनी उपस्थित राहून मंडळाच्या धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
दर्शनानंतर हरिनामाचा अखंड गजर करत दिंडी नालासोपारा (मोरेगाव) येथील श्री हनुमान मंदिरात पोहोचली. तेथे महाआरती, नामस्मरण व प्रार्थनेनंतर आषाढी दिंडी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. गेल्या 26 वर्षांपासून ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ धार्मिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. आषाढी दिंडी, हरिनाम सप्ताह, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आश्रमांना भेट, गरजूंना मदत, पूरग्रस्तांना सहाय्य अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे मंडळ समाजसेवेचा आदर्श निर्माण करत आहे. तसेच दरवर्षी जानेवारी महिन्यात मंडळातर्फे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमास सुमारे 5000 हून अधिक भाविक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात. “हरिनाम हाच समाजाला एकत्र आणणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा मार्ग आहे. प्रत्येकाने भक्तीबरोबरच सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्यावा,” असा संदेश मंडळाच्या वतीने देण्यात आला. भविष्यातही धार्मिक, सामाजिक व सेवाभावी कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला. मंडळाचे धनाजी जाधव, कार्याध्यक्ष सुनील कदम माऊली अध्यक्ष गणेश पवार माऊली, सचिव  शैलेश मोडक माऊली,
खजिनदार अंकुश सावंत माऊली
यांनी या सोहळ्याचे अथक परिश्रम घेऊन नियोजन केले होते. या यशस्वी आषाढी दिंडी सोहळ्यास मंडळाचे सर्व सभासद, महिला सभासद, हितचिंतक, देणगीदार आणि वारकरी भक्त यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल मंडळाने   सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.