Home नंदुरबार जिल्हा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात

0
Patriotic program held with enthusiasm at S. A. Mission English Medium High School on the eve of Independence Day.

नंदुरबार(प्रतिनिधी):- एस. ए. एम. ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य  पराग पोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात  ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताने झाली. त्यानंतर शिक्षक गौरव परमार यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देशाची एकता, अखंडता आणि प्रगती यासाठी प्रत्येक नागरिकाने एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी इयत्ता नववीतील विद्यार्थिनी प्रेरणा परदेशी, श्रेया पाटील, ध्रुव वसावे आणि देवयानी पाटील तसेच इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आर्या पटेल, सोफिया पूलापाका यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशभक्ती आणि राष्ट्राप्रती असलेली आपली जबाबदारी याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमांतर्गत गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सब -ज्युनिअर गट, इयत्ता सातवी ते आठवीसाठी ज्युनिअर गट आणि इयत्ता आठवी ते नववीसाठी सीनियर गट अशा विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. ज्युनिअर गटात रेड हाऊसने प्रथम क्रमांक, तर सीनियर गटात ब्लू हाऊसने प्रथम क्रमांक पटकावला.
यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सर्जनशीलता आणि संघभावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वर्ग सजावट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आकर्षक व देशभक्तीपर संकल्पनांवर आधारित वर्ग सजावट करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
प्राचार्य पराग पोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारताचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग व बलिदानाचे महत्त्व स्पष्ट केले. स्वातंत्र्य मिळविणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते अबाधित राखणे, संविधानाचा आदर करणे, देशाची एकता व अखंडता जपणे आणि जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कुशल मोरे आणि मोनाली पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षिका मिस. पूनम वळवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. फरहाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातील शिक्षक-शिक्षिका, संगीत विषय शिक्षक हितेश उपासनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
देशभक्ती, एकता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.