Home सरकारी योजना महाडीबीटी पोर्टलवर नव्याने २९ योजनांचे लोकार्पण; योजनांची संख्या १०५ वर

महाडीबीटी पोर्टलवर नव्याने २९ योजनांचे लोकार्पण; योजनांची संख्या १०५ वर

0
29 new schemes launched on the MahaDBT portal; total number of schemes reaches 105.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाडीबीटी पोर्टलवर आज नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले.

राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, हा यामागील उद्देश असून यावरील उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ही व्यवस्था सुरू झाल्यापासून शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून, योजनांचा गैरवापर लक्षणीयरीत्या कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, माहिती तंत्रज्ञान आयुक्त भुवनेश्वरी पी. तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

महाडीबीटी २.०

विविध योजनांसाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा नागरिककेंद्रित एकात्मिक प्रणाली महाडीबीटी २.० ने दिली आहे. सिंगल साइन-ऑन, रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी लाईव्ह डॅशबोर्ड आणि ‘नो युवर बेनिफिट’ यांसारख्या सुविधा या पोर्टलमध्ये उपलब्ध आहेत. ऑफलाईन प्रक्रियेतून ऑनलाइन प्रक्रियेकडे संक्रमण करताना मंजुरीची प्रक्रिया सुलभ करण्यावर तसेच नवीन योजना समाविष्ट करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. पोर्टलवर आधार आधारित पडताळणी, एंड-टू-एंड डिजिटल प्रक्रिया आणि पारदर्शक थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. आणखी २३१ योजनांचे काम प्रक्रियेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.