नंदुरबार जिल्ह्यातील ० ते १४ वर्ष वयोगटातील अस्थिव्यंग (दिव्यांग) बालकांसाठी मोफत तपासणी व सुधारक शस्त्रक्रिया करण्याच्या उद्देशाने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत जिल्हा रुग्णालय व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार तसेच आयुष रुग्णालय येथे करण्यात आले होते.
या शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ नंदनगरी आणि डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. RBSK पथकांमार्फत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून पाठविण्यात आलेल्या १०३ अस्थिव्यंग बालकांची तज्ज्ञ अस्थिरोग शल्यचिकित्सकांकडून सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर शस्त्रक्रियेस पात्र ठरलेल्या २० बालकांची निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर दि. २३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा रुग्णालय व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे मोफत सुधारक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे अस्थिव्यंग बालकांना चालणे, बसणे तसेच दैनंदिन जीवनातील हालचाली अधिक सक्षमपणे करता येणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येणार आहे. पालकांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
शिबिरामागील प्रमुख उद्देश बालकांमधील अस्थिव्यंग संबंधी आजारांची वेळेत तपासणी करून योग्य उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. RBSK अंतर्गत बालकांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेतली जात असून, जन्मतः क्लब फूट असलेल्या बालकांना ‘क्युअर इंडिया’ संस्थेच्या माध्यमातून मोफत बूट दिले जात आहेत. याच अनुषंगाने आज देखील ३ बालकांना तात्काळ तपासणी करून बूट प्रदान करण्यात आले. तसेच दर मंगळवारी जिल्हा रुग्णालय, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे याबाबत विशेष तपासणी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
या शिबिरात डॉ. मयुरेश वारके, रो. शिरीष सोनगडकर, रो. प्रशांत आंबेकर यांनी तपासणी व पुढील मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष रो. विवेक जैन, सचिव रो. राहुल पाटील, श्री. जय गुजराथी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख डॉ. ज्योती बागुल, तसेच RBSK कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. मनोहर ढिवरे यांनी विशेष प्रयत्न केले.
या उपक्रमासाठी RBSK पथकातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक, तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या समन्वयातून राबविण्यात आलेले हे शिबिर अस्थिव्यंग बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
(Collector Office Nandurbar)
#RBSK#RotarySupport#childhealth#HealthcareForAll
















