Home महाराष्ट्र ‘एक दिवस सैनिकासाठी’ अभियानाला सुरवात

‘एक दिवस सैनिकासाठी’ अभियानाला सुरवात

2
'One Day for a Soldier' ​​campaign launched

अमरावती: देशसेवेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ‘एक दिवस सैनिकांसाठी’ हे अभिनव अभियान सुरू केले आहे. ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात दिलेल्या आश्वासनानुसार, दर महिन्याचा पहिला मंगळवार हा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आला असून, त्याअंतर्गत काल 6 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या अभियानाचे आयोजन करण्यात आले.

या विशेष दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी (भातकुली) दादासाहेब दराडे, उपविभागीय अधिकारी (दर्यापूर) राजेश्वर हाडे, अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे, तहसीलदार अश्विनी जाधव (नांदगाव खंडेश्वर), तहसीलदार रवींद्र कानझडे (दर्यापूर) आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

या अभियानादरम्यान माजी सैनिकांच्या जमिनीचे प्रलंबित वाद, शेतीमध्ये जाण्यासाठी रस्त्यांची अडचण आणि माजी सैनिक विश्रामगृहाच्या बांधकामाशी संबंधित तांत्रिक विषयांवर चर्चा करण्यात आली. महसूल अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून अनेक प्रकरणांमध्ये जागीच मार्ग काढला, तर काही जटिल प्रकरणांमध्ये कालमर्यादा निश्चित करून ती सोडवण्याचे निर्देश दिले. या उपक्रमात मोठ्या संख्येने वीर माता, वीर पत्नी आणि माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पुढाकारामुळे प्रशासकीय दप्तरदिरंगाई दूर होऊन सैनिकांच्या प्रश्नांना न्याय मिळत असल्याबद्दल माजी सैनिक समुदायाने समाधान व्यक्त केले आहे.