वर्धा: कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कुष्ठरोग हा अधिसूचित आजार घोषित झाला आहे. या रोगाच्या व्यक्तींना शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्याकरीता आता खाजगी दवाखाने व वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश राहणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व व्यक्तींनी पुढाकार घेऊन यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
जिल्ह्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले. बैठकीला कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. रा.ज.पराडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल येळणे, आम्रपाली मोरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, गांधी मेमोरीअल लेप्रसी फाऊंडेशनचे सहाय्यक संचालक डॉ. विजय माखीवी, शिक्षण विभागाचे राजेंद्र मस्के, समाज कल्याण निरिक्षक विना शेंडे, सांख्यिकी सहाय्यक वैभव रास्ते, अवैद्यकीय पर्यवेक्षक नारायण बरेंडीया, निमवैद्यकीय अधिकारी निलय काळे, प्रशांत बारडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयेाजित ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांना कुष्ठरोगाबाबत माहिती व्हावी याकरीता जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे आव्हानात्मक घोषणापत्र व सरपंच यांचे लिखीत भाषण वाचुन दाखवून उपस्थित नागरिकांना शपथ दिल्या जाणार आहे.
विकसित भारत अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यामधून कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता सर्व विभागांचा समावेश घेऊन जिल्हास्तरावर जिल्हा समन्वय समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. तालुका स्तरावर तालुका समन्वय समितीचे गठन करण्यात आले आहे. तालुकास्तरावर समितीने बैठकांचे आयोजन करुन यामध्ये सर्व विभागांचा समावेश घेऊन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी गट विकास अधिकारी यांना दिले आहे.
कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग निवारण दिन व 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत कुष्ठरोग पंधरवाडा राबविण्यात येणार असून या पंधरवाड्या दरम्यान शाळांमध्ये नुक्कड नाटक, म्हणी लिहीणे, रोड शो, निबंध स्पर्धा, कुष्ठरोग विषयक गाणी, कविता, कटपुतली व सपना या पात्राद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे, असे सहाय्यक संचालक डॉ. रा.ज.पराडकर यांनी कळविले आहे.
000000
















