
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी संबंधित पोल्ट्री फार्मला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी, बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे २५ विशेष पथके आणि १५० कर्मचारी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगीतले.
आतापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजनांअंतर्गत सुमारे ५० हजार पक्षी, अंडी आणि मोठ्या प्रमाणातील खाद्य नष्ट करण्यात आले आहे. हा आजार अत्यंत वेगाने पसरणारा असल्याने, खबरदारी म्हणून ५ किलोमीटरच्या परिसरात पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री व हालचाल बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय आरोग्य यंत्रणेमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
“ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले.
नागरिकांनी स्वच्छता, सुरक्षितता आणि आरोग्यविषयक सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे, असेही आवाहन केले.
#BirdFlu#Nandurbar#Navapur#PublicHealth#DistrictAdministration#HealthAlert#StaySafe#Maharashtra#EmergencyResponse#Awareness















